2025 : सार्वत्रिक सुट्यांची यादी जाहीर
बेंगळूर : राज्य सरकारने 2025 सालातील सार्वत्रिक सुट्यांची यादी गुरुवारी जाहीर केली आहे. नववर्षाला दीड महिने बाकी असतानाच राज्य सरकारने सार्वत्रिक आणि मर्यादीत सुट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत रविवारी येणारा प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), गुढीपाडवा (30 मार्च) मोहरम (6 जुलै) आणि महालय अमावस्या (9 सप्टेंबर) तसेच दुसऱ्या शनिवारी येणारी कनकदास जयंती (8 नोव्हेंबर) हे सुटीचे दिवस म्हणून यादीत नमूद करण्यात आलेले नाहीत. एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात 4 ते 5 सार्वत्रिक सुट्या आहेत. मुस्लिम बांधवांचे सण नियोजित तारखेला न आल्यास सरकारी सेवेतील मुस्लीम कर्मचाऱ्यांना ते सण साजरा करणाऱ्या दिवशी सुटी मंजूर करता येईल, असे सरकारने पत्रकात म्हटले आहे. सरकारने याआधी सार्वत्रिक सुट्यांची तात्पुरती यादी तयार करून आक्षेप मागविले होते. आक्षेपांचा विचार करून गुरुवारी अंतिम यादी जाहीर करण्यात आली.