For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2024 : मी पुन्हा येणार

06:48 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
2024    मी पुन्हा येणार
Advertisement

येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मी पुन्हा येणार’ चे पालुपद जोरदारपणे सुरु करून देवेंद्र फडणवीस यांची हमखास आठवण देणे चालवले आहे. हे किती शुभ अथवा अशुभ? किती शुभशकुनी अथवा अपशकुनी? हे येणारा काळच दाखवेल. पण पंडित नेहरूंप्रमाणे तिसऱ्यांदा पंतप्रधानपद मिळवण्यासाठी सुरु असलेला आटापिटा ‘आजा बीजा तिजा’ त होणार की ‘तिसरे-घसरे’ होणार ते दोन महिन्यात दिसणार आहे.

Advertisement

महाराष्ट्रात झालेले ‘मी पुन्हा येणार’ हे प्रकरण भाजप आणि फडणवीसांच्या अंगलट आले होते, 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर होत्याचे नव्हते झाले अशा अतर्क्य आणि अनपेक्षित घटना एकामागून एक घडल्या होत्या. कालचे घनिष्ट मित्र हाडवैरी बनले आणि सारे मुसळ केरात गेले. कोण किती बरोबर अथवा कोण किती चूक? याबाबत अजूनही उलटसुलट आरोप होताना दिसतात.  अशातच निवडणूक तज्ञ योगेंद्र यादव यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने धमाल उडवून दिलेली आहे. यादव यांचा असा दावा आहे की भाजप आणि संघाने एक गुपचूप सर्वे केला आहे त्यानुसार भाजपला ‘चारसो पार’ च्या ऐवजी केवळ 215 जागावर समाधान मानावे लागेल. हा सर्वे म्हणजे बाजारगप्पा अथवा कसे ते येणारा काळ दाखवेल. जर भाजप 400 जागा मिळण्याची बढाई मारायला लागली आहे तर मग निवडणूकच कशाला घ्यायची? असा युक्तिवाद एका विरोधकाने केला.

वेगवेगळे सर्वे आणि मतदार चाचण्या पुढे करून विविध राजकीय पक्ष आपले उखळ पांढरे करत असतात आणि या साऱ्या प्रकारात प्रसारमाध्यमे भरपूर हात धुवून घेतात. जेव्हढ्या निवडणूका जास्त तेव्हढी त्यांची जास्त चांदी. इलेक्ट्रॉनिक माध्यमांची तर ही पर्वणीच. मोदींना हरवणारा लाल अजून जन्माला यायचा आहे. कोणताही विरोधी नेता पंतप्रधानांच्या पासंगाला देखील पुरत नाही असे दावे समर्थक मंडळी करत आहेत. टीना फॅक्टर (देअर इस नो अल्टरनेटीव्ह) चा हवाला देऊन मोदी वाजतगाजत परत सत्तेत येणार असे सांगितले जात आहे. हा टीना फॅक्टर नेहमी बरोबर असतो असे नाही. मतदार राजाच्या मनात नेमके काय असते काही कळत नाही.

Advertisement

20 वर्षांपूर्वी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भाजपने अशीच मोहीम आखली होती. ‘अटलजींच्या विरुद्ध कोण?’, असा बराच प्रचार झाला. तेव्हा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष भाजपच्या हातावर तुरी देतील असे कोणाही सत्ताधाऱ्याला स्वप्नातही वाटले नव्हते. थोडी कुणकुण लागली असती तर वाजपेयींनी सहा महिने अगोदर निवडणूकच घेतली नसती. जे लोक सत्तेत असतात त्यांना ‘फील गुड’ वाटतच असते तसे लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांना वाटले आणि भाजपचा घात झाला. 1977 साली आणीबाणीच्या नंतर जनता पक्ष सत्तेत येईल आणि इंदिरा आणि संजय गांधी स्वत: निवडणूक हारतील असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना वाटले नव्हते. परिस्थितीचा दट्ट्या असा होता की उत्तरप्रदेशात काँग्रेसची एक देखील जागा आली नाही. केंद्रातील सत्तेतून काँग्रेस पहिल्यांदा हाकलली गेली.

येती लोकसभा निवडणूक वेगळी आहे. कोणत्याच बाबतीत राज्यकर्ते आणि विरोधक यात लेवल प्लेयिंग फिल्ड नाही. सत्ताधारी पक्षाकडे प्रचंड साधने आहेत तर याउलट विरोधक म्हणजे लंकेची पार्वती. इलेक्टोरल बॉण्डद्वारा भाजपला निम्म्यापेक्षा जास्त पैसे मिळाले त्याने ही तफावत चांगलीच दिसून येत आहे. दुष्काळात तेरावा महिना असा प्रकार काँग्रेसबाबत घडला आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची बँक खाती गोठवून विरोधी पक्षांवर एक नवीनच संकट निर्माण केले गेले आहे. याबाबतीत निवडणूक संपेपर्यंत पुढील कारवाई होणार नाही असे सांगितले गेले असले तरी निवडणूक संपल्यासंपल्या विरोधकांना परत चिमटीत पकडण्याचे राजकारण सुरु होणार याचे सूतोवाच झालेले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात डांबून भाजपने अजून एक आघाडी उघडली आहे. गेल्या आठवड्यात रामलीला मैदानात झालेली विरोधी पक्षांची प्रचंड रॅली बरेच काही बोलून गेली. केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता आणि झारखंडचे तुरुंगात असलेले माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांची तेथील उपस्थिती बरंच काही सांगून जाते. आमच्या पतीला तुरुंगात डांबले तरी आम्ही पतिव्रता त्यांचा संघर्ष सोडणार नाही हा संदेश सत्ताधारी मंडळींना अडचणीत आणू शकतो. कोणताही कुशल सेनानी एकावेळी बऱ्याच आघाड्या उघडत नसतो. एका वेळी एका शत्रूला परास्त करण्याची रणनीती नेहमी बाळगली जाते. ‘वेडात दौडले वीर मराठे सात’ ही काही रणनीती नसते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच वेगळया घटना घडू लागल्या आहेत. चंदीगड महापौर निवडणुकीच्या प्रकरणापासून एकामागोमाग एक घटना सत्ताधाऱ्यांच्या विरोधी घडताना दिसत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोख्यांची वादग्रस्त योजना मोडीत काढणे म्हणजे विरोधकांचा मोठा विजय मानला जातो. गेल्या आठवड्यात ईव्हीएमच्या संदर्भात न्यायालयाने दिलेला निवाडा देखील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेलेला आहे. विरोधी पक्ष याबाबत निवडणूक आयोगाकडे अर्जविनंत्या देऊन थकले होते. न्यायालय त्यांच्या मदतीला आले आहे. मोदींचे गृहराज्य असलेल्या गुजरातमधून बुचकळ्यात पाडणारी वृत्ते येत आहेत. तेथील दोन जागेतील उमेदवार भाजपला अंतर्गत बंडाळीमुळे बदलणे भाग पडले आहे.

पंतप्रधानांचे खासमखास असलेले केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या उमेदवारीमुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांना हाकला असा राजपूत समाजाचा आग्रह आहे. एका वादग्रस्त वक्तव्याबाबत वारंवार माफी मागूनही हे वादळ शांत होत नाही आहे. रुपाला यांना काढले तर वजनदार पटेल समाज दुखावला जाईल अशा कात्रीत भाजप आहे. केजरीवाल यांच्या अटकेने राज्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्र काम करू लागल्याचे बोलले जाते.

जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजपकरता आव्हानात्मक स्थिती आहे. तेथील भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जम्मू विभागात काँग्रेस जोरदार टक्कर देत आहे, गुलाम  नबी आझाद यांचा छोटेखानी पक्ष या भागात भाजपकरता वोट कटवाचे काम करतोय असे दिसत आहे. लडाखमधील केंद्राविरुद्धच्या प्रचंड स्थानिक आंदोलनामुळे तेथील जागा गेल्यात जमा आहे असे पक्षातच मानले जात आहे. हरयाणामध्ये अचानक मुख्यमंत्री बदलला असला तरी विरोधक 3-4 जागांवर भाजपाला अडचणीत आणू शकतात.

मोदी आणि शहा यांचे वैशिष्ट्या हे की ते शेवटच्या चेंडूपर्यंत अगदी नेटाने खेळतात. त्यांनी आता दक्षिण दिग्विजयकरता काम सुरु केले आहे. तामिळनाडूत  पीएमके आणि व्हिसिके अशा द्राविडीयन पक्षांशी युती करून एक नवा प्रयोग चालवला आहे. तर अण्णामलाई या तरुण तडफदार नेत्याला राज्याचा पक्षाध्यक्ष बनवून पक्षबांधणी चालवली आहे. केरळमध्ये सुरेश गोपी आणि राजीव चंद्रशेखर यांच्यासारखे नव्या दमाचे उमेदवार बनवून राज्यातील राजकारण ढवळले आहे. आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्याशी युती करून भाजपचा चंचुप्रवेश केला आहे. पंतप्रधानांचे वाढलेले दक्षिण दौरे हे भाजपला प्रस्थापित करण्यासाठी किती उपयोगी ठरतात हे लवकरच दिसेल. मोदींचे कडवे समर्थक 2019ला भाजपला 543 सदस्यीय लोकसभेत 303 जागा मिळाल्या होत्या याची आठवण करून देऊन यावेळेला त्यात 15-20 ची भर पडून पक्ष 325 पर्यंत जाईल असे दावे करत आहेत.  भाजपचे विरोधक विखुरलेले असले तरी गेल्या निवडणुकीइतके भरकटलेले नाहीत, त्यामुळे काही ठिकाणी बऱ्याच हातघाईच्या लढाया होऊ शकतात.

महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत काय चित्र दिसणार त्यावर हा सामना कोणीकडे कलणार ते दिसणार आहे. भाजप आणि तिच्या विरोधकांकरिता रात्र वैऱ्याची आहे हेच खरे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :

.