2024 मध्ये पराभव झाल्यास राजकीय संन्यास
तेदेप प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची घोषणा
वृत्तसंस्था / अमरावती
तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी कुठल्याही स्थितीत निवडणुकीत विजयी करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. जर माझा पक्ष आंध्रप्रदेशात पुढील निवडणुकीत सत्तेवर न आल्यास भविष्यात मी कधीच निवडणूक लढविणार नसल्याचे नायडू यांनी म्हटले आहे. चंद्राबाबू यांनी 2021 मध्ये विधानसभेत प्रवेश करण्यावरूनही अशीच प्रतिज्ञा घेतली आहे.
2024 च्या निवडणुकीनंतर तेदेप सत्तेवर न परतल्यास माझी ती अखेरची निवडणूक असणार आहे. तेदेप सत्तेवर परतत नाही तोवर विधानसभेत पाऊल ठेवणार नाही या स्वतःच्या संकल्पाचा त्यांनी कुरनूल येथील एका रोड शोदरम्यान पुनरुच्चार केला आहे.
जनतेने पुढील निवडणुकीत आमच्या पक्षाला विजय मिळवून दिला नाही तर ती माझी अखेरची निवडणूक ठरू शकते. विधानसभेत जर मला परतायचे असल्यास आणि राजकारणात कायम रहायचे असल्यास आणि आंध्रप्रदेशला न्याय मिळवून द्यायचा असल्यास पुढील निवडणूक जिंकावी लागणार आहे असे उद्गार चंद्राबाबू यांनी काढले आहेत.
वायएसआर काँग्रेस पक्षाने विधानसभेत माझ्या पत्नीचा अपमान केल्याचा आरोप करत चंद्राबाबू यांनी तेदेप राज्यात सत्तेवर आल्यावरच आंध्रप्रदेश विधानसभेत पाऊल ठेवणार असल्याची प्रतिज्ञा 19 नोव्हेंबर 2021 रोजी केली होती. रोड शोमध्ये सामील लोकांना स्वतःच्या या प्रतिज्ञेची आठवण चंद्राबाबू यांनी करून दिली आहे.
राज्याला प्रगतिपथावर नेत भविष्यासाठीची धुरा इतरांच्या हाती सोपविणार आहे. माझी लढाई ही मुलांचे भविष्य, राज्याच्या भविष्यासाठी आहे. यापूर्वीही मी राज्याला विकासाची दिशा दाखवून दिली असून हे मॉडेलही प्रस्थापित केले आहे. जनतेने याविषयी विचार करत योग्य-अयोग्य काय ते जाणून घ्यावे. माझे म्हणणे खरे वाटल्यास लोकांनी मला सहकार्य करावे असे आवाहन चंद्राबाबू यांनी केले आहे.