2 हजार जवानांकडून बेपत्ता इसमाचा शोध
ड्रोन, श्वानपथकही शोधमोहिमेत सामील
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमध्ये बेपत्ता असलेल्या मैतेई समुदायाच्या इसमाचा शोध व्यापक स्तरावर घेतला जात आहे. या शोधमोहिमेत सुमारे 2 हजार जवान, श्वानपथक आणि ड्रोनची मदत घेतली जात आहे. सैन्यानुसार आसामच्या कछार जिल्ह्यातील मूळ रहिवासी लैशराम कमलबाबू सिंह हे सध्या इंफाळ पश्चिमच्या खुखरुल येथे राहत होते. 57 व्या माउंटेन डिव्हिजनच्या लेइमाखोंग सैन्यतळावर मिलिट्री इंजिनियरिंग सर्व्हिसेससोबत काम करणाऱ्या एका ठेकेदारासाठी ते कार्य पर्यवेक्षक म्हणून काम करत होते.
लैशराम हे सैन्यतळावरून बेपत्ता झाले होते, यामुळे सैन्य अधिकाऱ्यांनी त्यांना शोधण्याची जबाबदारी स्वीकारावी असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. विरेन सिंह यांनी म्हटले होते. 25 नोव्हेंबरपासून बेपत्ता लैशराम यांचा थांगपत्ता लावण्यासाठी मणिपूर पोलिसांकडुन सैन्याच्या मदतीने व्यापक स्तरावर संयुक्त शोधमोहीम हाती घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भारतीय सैन्याने 2000 हून अधिक जवान, हेलिकॉप्टर्स, ड्रोन आणि सैन्याच्या श्वानपथकाला सर्वप्रकारच्या उपकरणांसह शोधमोहिमेत भाग घेतला आहे. तसेच तांत्रिक गुप्तचर माहितीचा वापर करूनच पुढील तपास केला जात असल्याचे मणिपूर पोलिसांकडून सांगण्यात आले.
निदर्शने सुरूच
याचदरम्यान लैशराम कमलबाबू सिंह हे बेपत्ता झाल्यानंतर स्थापन संयुक्त कारवाई समितीने सैन्यतळापासून सुमारे 2.5 किलोमीटर अंतरावर कांटो सबलमध्ये स्वत:ची निदर्शने जारी ठेवली आहेत. लैशराम यांच्या पत्नी अकोइजम बेलारानी यांनीही या निदर्शनांमध्ये भाग घेतला आहे. लैशराम यांचे कुकी उग्रवाद्यांनी अपहरण केल्याचा दावा या निदर्शकांनी केला आहे.
मे 2023 पासून हिंसा
कांगपोकपी जिल्ह्यात असलेला सैन्यतळ हा राज्याची राजधानी इंफाळपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे. कांगपोकपी येथे कुकी लोकांचे देखील वास्तव्य आहे. मागील वर्षी मे महिन्यात हिंसा सुरू झाल्यावर लीमाखोंगनजीक राहणाऱ्या मैतेई लोकांनी पलायन केले होते. तर राज्यात झालेल्या हिंसेत आतापर्यंत 250 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे.