कांदा दरात पुन्हा 200 तर रताळी 100 रुपयांची घसरण
बटाटा दर स्थिर, भोपळा दरात क्विंटटलला 550 रुपयांची वाढ : भाजीपाल्याचे दरही स्थिर
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा दरात पुन्हा प्रति क्विंटलला 200 रुपयांनी घसरण झाली आहे. दरातदेखील 100 रुपयांनी कमी झाला आहे. इंदोर बटाटा, आग्रा बटाटा, तळेगाव बटाटा यांचा भाव प्रति क्विंटलला स्थिर आहे. भाजीमार्केटमध्ये गोल भोपळा क्विंटलचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे. तर इतर काही भाजीपाल्यांचे भाव स्थिर आहेत तर मेथी, कोथिंबीर, मुळा बंडल यांच्या दरात किंचित घट झाली आहे. सध्या बेळगाव परिसरातील भाजीपाला आवक विक्रीसाठी येत आहे. तर बेंगळूरहून बिन्स, गाजरची आवक येत आहे तर मुंबईहून ढबू मिरची, बटका मिरची, जी फोर मिरचीची आवक येत आहे. मध्यप्रदेशहून मटरची आवक भाजीमार्केटमध्ये येत आहे. यामुळे बाजारात भाजीपाला आवकेमध्ये समतोलता असल्यामुळे काही मोजक्या भाजीपाल्याच्या दरात घट निर्माण झाली आहे. तर काही भाजीपाल्यांच्या दरात स्थिरता आहे. यामुळे सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
मागच्या आठवड्यातील शनिवार दि. 20 रोजी कांदा भाव क्विंटलला 500 ते 2000 रुपये झाला होता. इंदोर बटाटा 800 ते 1900 रुपये आग्रा बटाटा 1200 ते 1700 रु. तळेगाव व बटाटा 1000 ते 1700 रुपये झाला होता. तर रताळी 300 ते 1100 रुपये झाली होती. आणि बुधवारच्या बाजारात कांदा प्रति क्विंटलला 500 ते 1700 रुपये झाला होता. आग्रा बटाटा 1000 ते 1600, तळेगाव बटाटा 1000 ते 1600 रुपये, रताळी 300 ते 1100 रुपये भाव झाला होता. मात्र, आजच्या शनिवार दि. 27 रोजी झालेल्या बाजारात कांदा दर 500 ते 1500 रुपये क्विंटल झाला तर काही ठिकाणी चुकून 1550 ते 1600 रुपये देखील भाव करण्यात आला आहे. इंदोर बटाटा 1000 ते 1900 रुपये तर आग्रा बटाटा 800 ते 1600 रु., तळेगाव बटाटा 800 ते 1700 रुपये भाव करण्यात आला आहे, अशी माहिती एका अडत दुकानदाराने दिली.
कांदा दरात घसरण
महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील कांदा आवक डिसेंबरपासून बेळगाव मार्केट यार्डमध्ये येण्यास प्रारंभ झाला आहे. गेल्या 15 दिवसामध्ये कांद्याचा भाव प्रति बाजारात घसरत चालला आहे. महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे बाजारात दिवसेंदिवस आवक वाढतच चालली आहे. शनिवारी मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या सुमारे 90 ट्रक आवक बाजारात विक्रीसाठी आली होती. यामुळे कांदा दरात पुन्हा 200 रुपयांनी घसरण झाल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
मार्च अखेरपर्यंत कांदा निर्यातीवर बंदी
तीन महिन्यापूर्वी कांदा आवकेत टंचाई निर्माण झाल्याने कांदा भाव क्विंटलला सुमारे 3500 ते 6000 रुपये झाला होता. यामुळे कांद्याने वांदा केला होता. सर्वसामान्यांना कांदा खरेदी करणे अवघड झाले होते. यामुळे केंद्र सरकारने एक महिन्यापूर्वीच भारतामधून इतर देशांना निर्यात होणाऱ्या कांद्यावर मार्चअखेरपर्यंत पूर्णपणे बंदी घातली आहे. यामुळे कांदा भाव आटोक्यात आला आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.
शेतकऱ्यांतून नाराजी
गेले तीन महिने काबाडकष्ट करून बियाणे, औषधे यासाठी कर्जे काढून कांदा उत्पादन घेतले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये गुंतवले आहेत. महाराष्ट्रातून बेळगाव मार्केटमध्ये आणि इतर राज्यामध्ये कांदा विक्रीसाठी शेतकरी जात आहेत. मात्र, दिवसेंदिवस कांदा दरात घसरण होत आहे. यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. पिशवी आणि भाड्याचा खर्चदेखील निघत नसल्याची खंत शेतकरी वर्गाने व्यक्त केली. केंद्र सरकार शेतकऱ्यांचा विचार करून परदेशामध्ये कांदा निर्यात पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करीत आहे.
रताळी आवकेत घट
प्रत्येक बाजारात मार्केट यार्डमध्ये रताळी आवकेने गजबजली असतात. मात्र, पश्चिम भागातील शेतकरी सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या यात्रेला गेले असल्यामुळे बाजारात केवळ 40 ट्रक आवक विक्रीसाठी आली होती. तर मुंबई आणि इतर राज्यामध्ये रताळ्याला मागणी कमी झाल्याची माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली.