नराधमाला 20 वर्षांचा तुरुंगवास
केवळ तेरा वर्षांच्या बालिकेवर केला होता अत्त्याचार : साडेनऊ लाखांचा दंड, फोंड्यात 2015 मधील घटना
- न्यायाधीश : सई प्रभू देसाई
- सरकारी वकिल : अॅना मेंडोसा,तेमा नार्वेकर
- तपास अधिकारी : सुदेश नाईक
पणजी : फोंडा येथील एका 13 महिन्याच्या बालिकेवर निर्घृण बलात्कार केल्याप्रकरणी 29 वर्षीय आरोपीला पणजी येथील बाल न्यायालयाच्या अध्यक्ष सई प्रभू देसाई यांनी 20 वर्षे तुरुंगवास आणि 9.50 लाखांचा दंड भरण्याची सजा ठोठावली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना 2015 साली फोंडा येथे घडली होती. फोंडा येथे एका अल्पवयीन बालिकेच्या पित्याने 30 ऑक्टोबर 2015 रोजी पोलिसात तक्रार दाखल केली होती की दुपारच्या सुमारास आरोपीने त्याच्या मुलीला एका गाडीतून उचलून नेले. या लहानग्या मुलीवर या नराधमाने बलात्कार केल्याने तिला रक्तस्त्राव झाला होता. याप्रकरणी तत्कालीन फोंडा पोलिसस्थानकाचे पोलिस निरीक्षक (विद्यमान उपअधीक्षक) सुदेश नाईक यांनी तातडीने हालचाली करून आरोपीला दुसऱ्या दिवशी बेड्या ठोकल्या होत्या. याप्रकरणी 2016 साली आरोपपत्र बाल न्यायालयात दाखल करण्यात आले होते.
आरोपी सर्व गुन्ह्यांत दोषी
फोंडा पोलिसांनी आरोपी विरोधात भादंसंच्या कलम 413, 363, 342, 376 तसेच 8 (2) गोवा बाल हक्क न्यायालय कायदा 2003 आणि पोक्सो 2012 नुसार गुन्हा नोंद करून आरोपीला अटक केली होती. निरीक्षक सुदेश नाईक यांनी योग्य तपास करून 994 पानाचे आरोपत्र 25 जानेवारी 2016 रोजी न्यायालयात सादर केले होते. बालन्यायालय पणजी या प्रकरणाचा निवाड देताना आरोपीला सर्व गुह्यांसाठी दोषी ठरवीले आहे.
बाल न्यायालयात सुनावणी
पणजी येथील बाल न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी घेऊन भादंसंच्या-363 कलमाखाली 5 वर्षे तुरुंगवास आणि 50 हजार रुपयांचा दंड ,342 कलमाखाली 20 वर्षे तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांचा दंड, गोवा बाल कायद्याच्या कलम-2 खाली 20 वर्षे तुरुंगवास आणि 2 लाख रुपयांचा दंड, कलम 6 खाली 20 वर्षे तुरुंगवास आणि 2 लाख रुपयांचा दंड आदी सजा ठोठावण्यात आली. या सजा आरोपीने एकत्र भोगताना एकूण 20 वर्षे तुरुंगवास आणि 9.50 लाखाचा दंड भरण्यास फर्मावले आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅना मेंडोसा आणि तेमा नार्वेकर यांनी यशस्वी बाजू मांडली.