अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास 20 वर्षे सक्तमजूरी
जबरदस्तीने लग्न करुन अत्याचार : आईला ठार मारण्याची धमकी
इस्लामपूर प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वैभव नंदकुमार लोंढे (24 रा. बोरगाव) याला न्यायालयाने 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पहिले जिल्हा न्यायाधीश ए. एस. गांधी यांनी हा निकाल दिला.
आरोपी वैभव लोंढे याने अल्पवयीन मुलीस माझ्याबरोबर लग्न कर नाहीतर बदनामी करेन, तसेच आईला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. यानंतर त्याने मुलीस जबरदस्तीने गाडीवर बसवून तीला घरी नेले. तिच्या गळयात हार घालून लग्न करण्याचा बहाणा केला. त्याने या पीडित मुलीशी जबरदस्तीने शरीर संबंध केले. यामध्ये ती पाच महिन्यांची गर्भवती राहिली. याप्रकरणी आरोपी लोंढे याच्या विरुध्द इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
न्यायालयात गुणदोषावर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील रणजित एस. पाटील यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे 4 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. यापैकी फिर्यादी, पीडित, पंच व तपासी अंमलदार सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने आरोपीस पोक्सो कायदा कलम 6 मध्ये दोषी धरून 20 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने साधी कारावासाची शिक्षा सुनावली. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शितोळे, पो.कॉ. सुनिल पाटील व इतर स्टाफने सहकार्य केले.