कसोटीच्या पहिल्याच दिवशी 20 बळी
नौमनअलीचे 6 बळी, वेरीकेन, मोती प्रभावी
वृत्तसंस्था / मुल्तान
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीतील पहिला दिवस गोलंदाजांनी गाजविला. यजमान पाक आणि विंडीज यांचे पहिले डाव समाप्त झाले. विंडीजच्या डावात गुदाकेश मोती अर्धशतक झळकविले. तर पाकच्या डावात रिझवानचे अर्धशतक एका धावेने हुकले. पाकच्या नोमन अलीने 41 धावांत 6 गडी बाद केले. तर विंडीजतर्फे वेरीकेन, मोती आणि रॉच यांची प्रभावी गोलंदाजी झाली. विंडीजने पहिल्या डावात पाकवर 9 धावांची नाममात्र आघाडी घेतली.
या मालिकेतील पहिली कसोटी यजमान पाकने केवळ तीन दिवसांत एकतर्फी जिंकली होती. नौमन अलीची फिरकी पहिल्या कसोटी प्रमाणेच दुसऱ्या कसोटीतही विंडीजला दमविली. या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण उपाहारापर्यंतच्या पहिल्या दोन तासांच्या सत्रात विंडीजचा डाव 41.1 षटकात 163 धावांत आटोपला. विंडीजचा निम्मा संघ 38 धावांत तंबूत परतला होता. मात्र गुदाकेश मोती व वेरिकेन या शेवटच्या जोडीने 68 धावांची भागिदारी केल्याने विंडीजला 163 धावांपर्यंत मजल मारता आली. मोतीने 87 चेंडूत 4 चौकारांसह 55 तर वेरिकेनने 40 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 36 तसेच रॉचने 45 चेंडूत 2 चौकारांसह 25 आणि हॉजने 1 चौकारासह 21 धावा मजविल्या. विंडीजच्या 4 फलंदाजांना खाते उघडता आले नाही. नौमनअलीने 41 धावांत 6 तर साजिद खानने 64 धावांत 2 तसेच कासीफअली व अब्रार अहम्मद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
पाकच्या पहिल्या डावाला उपाहारानंतर प्रारंभ झाला आणि चहापानापर्यंत त्यांनी 22 षटकात 4 बाद 70 धावा जमविल्या होत्या. मोहम्मद रिझवानने 75 चेंडूत 8 चौकारांसह 49 तर सौद शकीलने 62 चेंडूत 2 चौकारांसह 32, कर्णधार शान मसुदने 1 चौकारासह 15, कमरान गुलामने 1 चौकारासह 16 तर साजीदखानने 2 चौकारांसह नाबाद 16 धावा जमविल्या. खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये पाकचे 6 गडी 84 धावांत तंबूत परतले. पाकचा पहिला डाव 47 षटकात 154 धावांवर आटोपल्याने विंडीजने 9 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. ही कसोटी पहिल्या सामन्याप्रमाणेच तीन दिवसांतच संपेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विंडीजतर्फे वेरिकेनने 43 धावांत 4, मोतीने 49 धावांत 3, रॉचने 15 धावांत 2 गडी बाद केले.
संक्षिप्तधालफक: विंडीज 41.1 षटकात सर्वबाद 163 (मोती 55, वेरिकेन नाबाद 36, रॉच 25, हॉज 21, अवांतर 12 नौमन अली 6-41, साजिदखान 2-64, कासीफअली व अब्रार अहम्मद प्रत्येकी 1 बळी), पाक 47 षटकात सर्वबाद 154 (मोहम्मद रिझवान 49, सौद शकील 32, कमरान गुलाम 16, शान मसुद 15, साजीद खान नाबाद 16, अवांतर 5 वेरिकेन 4-43, मोती 3-49, रॉच 2-15)