जैव-वैद्यकीय कचरा उघड्यावर
कोल्हापूर :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयामध्ये (सीपीआर) जैव-वैद्यकीय कचरा उघड्यावर पडत आहे. पिशव्यांमध्ये एकत्र गोळा केलेला जैव-वैद्यकीय कचरा तासंतास उघड्यावर टाकला जात असल्याने रूग्ण, नातेवाईक व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. दिसेल त्या मोकळ्या डंप केलेला कचरा वेळेत उचलला जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सीपीआरमध्ये रोज हजारो रूग्ण उपचरासाठी येतात. शेकडो रूग्ण अॅडमिट केले जातात. एकूण 18 इमारतीमधील 36 वॉर्डमध्ये विविध उपचार केले जातात. इंजेक्शन, ड्रेसिंग, सलाईन, ऑपरेशन, प्रसुती, बालविभागात रोज कचरा निर्माण होतो. कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी खासगी कंपनीला ठेका दिला आहे. कंपनीकडून स्वच्छतेसाठी कंत्राटी कर्मचारी नेमले आहे. कर्मचाऱ्यांकडून सर्व विभागीतील जैव-वैद्यकीय कचरा पिशव्यांमध्ये भरून एकत्र केला जातो. अनेकवेळा एकत्र केलेला कचरा वेळेत उठाव होत नाही. त्यामुळे कचरा तसाच पडून राहतो. काहीवेळा भटकी कुत्री हा कचरा विस्कटतात त्यामुळे इतरत्र कचरा विखुरला जाण्याचे प्रकारही घडतात.
जुना अपघात विभागाच्या पाठीमागे ये-जा करण्याच्या वाटेतच तासंतास प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधलेला जैव-वैद्यकीय कचरा पडून असल्याचे नेहमी निदर्शनास येते. त्यापाठोपाठ दूधगंगा, वेदगंगा इमारतीच्या मोकळ्या जागेतही नेहमी कचरा साचेलला असता. येथील बर्न विभागाच्या पाठीमागे घन कचरा डंप केला जातो. याचा उठावही वेळोवेळी होत नाही. यामुळे नेहमी याचे ढीग साचलेले असतात. काहीवेळा घनकचऱ्यामध्ये जैव-वैद्यकीय कचरा एकत्र होत असल्याचे प्रकारही घडतात.