गर्दीत कार घुसविल्याने 20 जखमी
वृत्तसंस्था / लॉस एंजल्स
अमेरिकेच्या कॅलिफोर्निया प्रांतातील लॉस एंजल्स शहरात एका कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीत कार घुसविण्यात आल्याने 20 जण जखमी झाले आहेत, असे वृत्त आहे. जखमींपैकी 8 ते 10 जण गंभीर आहेत. हा दहशतवादी हल्ला असावा असा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. जखमींवर उपचार केले जात आहेत. या घटनेचे व्हिडीओ चित्रण प्रसिद्ध झाले असून ही कार हेतुपुरस्सर गर्दीत घुसविण्यात आल्याचे या चित्रणावरुन स्पष्ट होत आहे, असे काही पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार एका नाईटक्लबच्या जवळ घडला. यावेळी येथे जवळपास 300 लोकांची उपस्थिती होती. अतिवेगाने कार गर्दीत घुसल्याने अनेकजण तिच्याखाली चिरडले गेले आहेत. या घटकेचे कारण अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेले नसले, तरी सर्व शक्यता गृहित धरुन तपास केला जाणार आहे, असे लॉस एंजल्सच्या स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.