थेट पाईपलाईनच्या विद्युत वाहिनीचे 20 कोटी हवेतच ! खासदार धनंजय महाडिक, आढावा बैठकीत नव्याने प्रस्ताव देण्याच्या सुचना
कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूरसाठी जिव्हाळ्याची असणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेला विद्युत पुरवठा करणारी वाहिनी बिद्री येथून 27 किलोमीटर वरुन घेण्यात आली आहे. मुळातच दीड किलोमीटवरुन ही लाईन घेणे अपेक्षीत होते. मात्र असे न करता 27 किलोमीटर वरुन ही लाईन का घेण्यात आली असा प्रश्न शुक्रवारी महापालिकेच्या आढावा बैठकीत खासदार धनंजय महाडिक यांनी उपस्थित केला. आता पुन्हा भूमिगत वाहिनीसाठी 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव का पाठविण्यात आला आहे असा सवाल उपस्थित करत, दिड किलोमीटर येथून महाजेनको येथून थेट पाईपलाईनसाठी विद्युत पुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना खासदार धनंजय महाडिक यांनी दिल्या.
कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनद्वारे स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी थेट पाईपलाईन योजना कार्यान्वीत करण्यात आली. नोव्हेंबर 2023 पासून थेट पाईपलाईनद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र थेट पाईपलाईन योजनेतील त्रुटी यानंतर समोर येवू लागल्या. थेट पाईपलाईनचा विजपुरवठा खंडीत झाल्याने गेल्या आठ महिन्यात 10 ते 15 वेळा शहराला पाण्यापासून वंचीत रहावे लागत आहे. थेट पाईपलाईनला बिद्री येथील सबस्टेशनमधून म्हणजेच 27 किलोमीटरवरुन विद्युत पुरवठा करण्यात आला आहे. वादळी पाउस, झाडे पडल्याने हा विद्युत पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. यामुळे या वाहिनीला पर्याय म्हणून भूमिगत विद्युत वाहिनीचा प्रस्ताव समोर आला आहे. यासाठी अंदाजे 20 कोटी रुपये खर्च अपेक्षीत असल्याचे पत्र राज्य शासनाला देण्यात आले आहे.
खासदार धनंजय महाडिक यांनी यावर आक्षेप घेत पहिल्यांदाच थेट पाईपलाईनला विजपुरवठा करण्याचे काम महावितरणकडून करुन घेणे अपेक्षीत होते, मात्र खासगी कंपनीला ठेका देवून 20 कोटी रुपये का हवेत घालवले असा सवाल उपस्थित करण्यात केला. तसेच आता परत नव्याने आणखी 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव का तयार करण्यात आला आहे, अशी विचारणा महाडिक यांनी केली. तसेच आत्ता जी वाहिनी भूमिगत टाकायची आहे, त्यासाठी वनविभगाची परवानगी घेतली आहे काय असा सवाल उपस्थित केला. यावर महापालिकेच्या वतीने हा प्रस्ताव महावितरण कंपनीकडून आपणास सुचविण्यात आल्याचे सांगितले. भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी योजनेपासून दिड किलोमीटर अंतरावरुन विद्युत पुरवठा घेण्याचा प्रस्ताव सोईस्कर असल्याचे सांगितले. माजी नगसरेवक जयंत पाटील यांनीही या प्रस्तावाचा विचार करण्याच्या सुचना महापालिका प्रशासनास दिल्या. खासदार धनंजय महाडिक यांनी याबाबत प्रस्ताव करुन तातडीने सादर करावे, याचा पाठपुरावा करुन अशी सुचना महापालिकेस केली. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी आठ दिवसात प्रस्ताव तयार करुन देण्याचे आश्वासन दिले.
माझी जागा देतो...
काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेस विद्युत पुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी येथील महाजेनकोच्या सबस्टेशनमधून विद्युत पुरवठा घेण्याचा नवीन प्रस्ताव समोर आला. मात्र यासाठी 5 हजार स्केअरफुट जागा आवश्यक आहे. धरणाशेजारी असणारी सर्व जागा वनविभागाच्या अखत्यारित येते, यामुळे वनविभागाकडून ही जागा घ्यावी लागेल असे माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. मात्र या मोबदल्यात त्यांना जागा द्यावी लागेल असे सांगताच खासदार धनंजय महाडिक यांनी राधानगरी येथे आमची 25 एकर जागा आहे. यापैकी 5 हजार स्केअरफुट जागा देतो अशी घोषणा केली.