वर्धा-बडनेरा रेल्वेमार्गावर मालगाडीचे 20 डबे घसरले
ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वर्धा-बडनेरा रेल्वेमार्गावर मालखेड रेल्वे स्टेशनजवळ मालगाडीचे 20 डबे घसरले आहेत. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर या मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. या दुर्घटनेमुळे नागपूर-मुंबई मार्गावरील अनेक गाडय़ा रद्द झाल्या आहेत. तर काही गाडय़ा पर्यायी मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
अपघातग्रस्त मालगाडी ही कोळसा घेऊन जात होती. या दुर्घटनेमुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं असून, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेमार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनासोबतच जिल्हा प्रशासन, तहसीलदार राजेंद्र इंगळे, नायब तहसिलदार केशव मळसने, मंडळ अधिकारी अमोल देशमुख, तलाठी प्रफुल्ल गेडाम पोलीस पाटील, एमव्ही माहुरे यांच्यासह 700 हून अधिक कर्मचारी घटनास्थळी दाखल आहेत. आज संध्याकाळपर्यंत या मार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.
अधिक वाचा : माझ्याशी गद्दारी केली; शेतकऱ्यांशी करू नका, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
वर्धा-भुसावळ, नागपूर-सीएसएमटी सुपरफास्ट एक्सप्रेस, नागपूर-अमरावती इंटरसिटी सुपरफास्ट एक्सप्रेस, गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, नागपूर-पुणे एक्सप्रेस आणि अजनी-अमरावती एक्सप्रेस या ट्रेन रद्द झाल्या आहेत. तर पुणे-हटीया एक्सप्रेस ही चांदुर बाजार नरखेड मार्गे वळविण्यात आली आहे. अहमदाबाद पुरी एक्सप्रेस, शालिमार एक्सप्रेस आणि हावडा सीएसएमटी एक्सप्रेस अन्य मार्गावर वळवण्यात आली आहे.