20 हजार अफगाणींना आश्रय देणार ब्रिटन
महिलांना मिळणार प्राथमिकता
अफगाणिस्तानवर तालिबानच्या कब्जानंतर अनागोंदीची स्थिती आहे. निवडक देश वगळता अमेरिका, भारत आणि सौदी अरेबिया समवेत अन्य देशांनी स्वतःचा दूतावास बंद करत तेथील कर्मचाऱयांना बाहेर काढले आहे. तर संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार परिषद 24 ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी एक विशेष अधिवेशन आयोजित करणार आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटनने 20 हजार अफगाण नागरिकांना आश्रय देण्याची घोषणा केली आहे.
ब्रिटन 20 हजार अफगाण शरणार्थींचा स्वीकार करणार आहेत. यात महिला आणि मुलींना प्राथमिकता दिली जाईल असे ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीति पटेल यांनी म्हटले आहे. आमची नवी अफगाण नागरिक पुनर्वसन योजना 20 हजार लोकांचे स्वागत करणारी आहे. ब्रिटन प्रामुख्याने तालिबानच्या राजवटीत स्वतःची सुरक्षा आणि भविष्यावरून चिंतेत असणाऱया महिला आणि मुलींना आश्रय प्रदान करणार असल्याचे त्या म्हणाल्या.
3,200 लोकांना काढले बाहेर
अमेरिकेच्या सैन्याने युद्धग्रस्त देशामधून आतापर्यंत 3,200 लोकांना बाहेर काढले आहेत. तर भारताने देखील स्वतःच्या दूतावासाच्या अधिकाऱयांसमवेत सुमारे 500 जणांना परत आणले आहे. तर अद्याप काही भारतीय अफगाणिस्तानात अडकून पडले असण्याची शक्यता आहे. त्यांना देखील मायदेशी परत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. भारताने स्वतःचा दूतावास बंद केलेला नाही, स्थानिक कर्मचारी तेथे सेवा प्रदान करत असल्याचे सांगण्यात आले.