भटक्या कुत्र्याने तोडले बालिकेच्या चेहऱ्याचे लचके
चावा घेणारा कुत्रा पिसाळल्याचा संशय : कुत्र्याला पकडून ठेवले देखरेखीखाली
बेळगाव : भटक्या कुत्र्याने हल्ला करत चेहऱ्याचे लचके तोडल्याने दोन वर्षांची बालिका गंभीर जखमी झाली आहे. गुरुवार दि. 9 रोजी सकाळी 11 च्या दरम्यान सांबरा रोड एससी मोटर्सनजीकच्या मारुतीनगर येथे ही घटना घडली असून आराध्या उमेश तरगार (वय 1 वर्षे 10 महिने) असे जखमी बालिकेचे नाव आहे. तिच्यावर शहरातील एका इस्पितळात उपचार सुरू आहेत. बालिकेचा चावा घेणारा तो कुत्रा पिसाळलेला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याला पकडून श्रीनगर येथील एबीसी सेंटरमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आराध्या ही नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी 11 च्या दरम्यान घरासमोर खेळत होती. तितक्यात त्या ठिकाणी आलेल्या एका कुत्र्याने तिच्यावर हल्ला करत कपाळ, गालाचा चावा घेण्यासह ओठाचा लचका तोडला. इतकेच नव्हेतर हनुवटीपर्यंत तोंड फाटले आहे. हा प्रकार लक्षात येताच आराध्याची आई आणि परिसरातील नागरिकांनी कुत्र्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या कुत्र्याने बराच उशीर बालिकेचा चावा घेतला. त्यामुळे ती गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाली.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास नकार
काहीवेळानंतर तिला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र सिव्हिलमधील डॉक्टरांनी उपचार करण्याऐवजी तिला हुबळी येथील किम्स हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा अजब सल्ला दिला. अलिकडेच सिव्हिल हॉस्पिटल आवारातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण करण्यात आले आहे. तरीही जखमी झालेल्या बालिकेवर उपचार करण्यास नकार दिल्याने संताप व्यक्त करण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांकडून रेफर लेटर घेऊन पालकांनी गंभीर जखमी स्थितीतील बालिकेला नेहरुनगर येथील एका इस्पितळात दाखल केले. त्या ठिकाणी तिच्यावर उपचार सुरू असून प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च येणार असल्याचे पालकांना सांगितले जात आहे. सदर कुटुंबीय गरीब असल्याने त्यांना सर्जरीसाठी येणारा खर्च परवडणारा नाही.
गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात भटक्या कुत्र्यांकडून सातत्याने नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. मात्र महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच मनपा पशुसंगोपन विभागाचे वरिष्ठ पशू निरीक्षक राजू संकण्णवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाव घेतली. दोन दिवसापूर्वी पूर्वीदेखील कुत्र्यांने काहीजणांचा चावा घेतल्याचे रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे परिसरातील तीन कुत्रे पकडून त्यांची रवानगी श्रीनगर येथील गोशाळेत करण्यात आली. एकंदरीत वारंवार नागरिकांवर कुत्र्यांचे हल्ले होत असले तरी महापालिकेचा आरोग्य विभाग मात्र सुस्त असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नार्वेकर गल्ली, केरकळबागेत 10 जणांचा चावा
गेल्या काही दिवसांपासून नार्वेकर गल्ली आणि केरकळबाग परिसरात फिरणाऱ्या एका कुत्र्याने 10 दिवसांत 10 हून अधिक जणांचा चावा घेतला आहे. त्यामुळे नागरिकांत दहशत निर्माण झाली असून त्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे. गुरुवारी नार्वेकर गल्लीत सदर कुत्र्याला पकडण्यात आले.
मारुतीनगरात 3 कुत्रे पकडले
सांबरा रोडवरील मारुतीनगर परिसरात गेल्या दोन दिवसांत कुत्र्यांनी काही जणांचा चावा घेतल्याच्या तक्रारी रहिवाशांतून करण्यात आल्या. त्यामुळे मनपाचे पशू संगोपन विभागाचे वरिष्ठ पशुनिरीक्षक राजू संकण्णवर व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील 3 कुत्रे गुरुवारी पकडली. पकडलेली कुत्रे श्रीनगर येथील एबीसी सेंटरमध्ये ठेवण्यात आली आहेत.