काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण
दोन एके-56 समवेत मोठ्या प्रमाणात दारूगोळा हस्तगत
वृत्तसंस्था/शोपियां
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. शोपियांमध्ये एका मोहिमेदरम्यान दोन हायब्रिड दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs अन् दारूगोळा हस्तगत केला आहे. विशेष इनपूटनंतर सुरक्षा दलांनी बसकुचन येथे मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दलांनी परिसराला घेरले असता एका ठिकाणी दहशतवाद्यांच्या हालचाली दिसून आल्या होत्या. मोहिमेदरम्यान लष्कर-ए-तोयबाचे दोन हायब्रिड दहशतवादी इरफान बशीर आणि उजैर सलाम यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांच्याकडुन दोन एके-56 रायफल्स, चार मॅगजीन, दोन हँडग्रेनेड हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी संबंधित कलमांच्या अंतर्गत एफआयआर नोंदवित तपास सुरू करण्यात आल्याचे शोपियां पोलिसांकडून सांगण्यात आले.
नरवाल येथे मिळाले तीन मोर्टार
जम्मू शहराच्या नरवाल ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एका रस्त्याच्या कडेला तीन मोर्टार आढळू आले, पोलीस आणि बॉम्बविरोधी पथकाने तिन्ही मोर्टार ताब्यात घेत नष्ट केले आहेत. अलिकडच्या तणावादरम्यान पाकिस्तानकडुन हे मोर्टार डागण्यात आले असावेत असे मानले जात आहे.