गोळीबारात 2 ठार : 9 जखमी, 5 घरांनाही आग
वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यात रविवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एका महिलेसह दोन जण ठार झाले. महिलेची 13 वर्षांची मुलगी आणि एका पोलीस अधिकाऱ्यासह नऊ जण जखमी झाले आहेत.
इंफाळपासून 18 किमी अंतरावर असलेल्या कोत्रुक गावात मैतेई समुदायाचे लोक राहतात. रविवारी दुपारी दोन वाजता गोळीबार झाल्यानंतर जीव वाचवण्यासाठी लोकांनी तेथून पळ काढला. दहशतवाद्यांनी रिकामी घरे लुटली. तसेच 5 घरे आणि तेथे उभी असलेली वाहने पेटवून दिली. मात्र, रात्री सुरक्षा दलांनी हल्लेखोरांना हुसकावून लावले. पुन्हा झालेल्या या हल्ल्यानंतर परिसरात अधिक सुरक्षा फौजफाटा पाठविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी कोत्रुक आणि कडंगबंद खोऱ्यातील खालच्या भागात डोंगराच्या वरच्या भागातून गोळीबार केला. तसेच ड्रोनद्वारेही हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे महिला, लहान मुले आणि वृद्धांसह अनेकांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला. गोळीबारात जखमी झालेल्या 9 जणांपैकी 5 जणांना गोळ्या लागल्या होत्या. या हल्ल्यात ड्रोन बॉम्बचा वापर करण्यात आल्याचा दावा स्थानिक लोकांनी केला आहे.