शिपयार्डमध्ये स्फोटात 2 ठार 5 जखमी
रासई लोटली ‘विजय मरिन’मधील दुर्घटना : बांधणी सुरु असलेल्या जहाजाने घेतला पेट : बंदिस्त खोलीत स्फोट होऊन आग लागल्याचा अंदाज
मडगाव : जहाजबांधणी व जहाज दुरुस्ती क्षेत्रातील गोव्यातील अग्रगण्य समजली जाणाऱ्या रासई -लोटली येथील विजय मरिन शिपयार्डमध्ये शुक्रवारी सायंकाळी उशिरा जबरदस्त स्फोट झाला. या स्फोटात दोघेजण ठार झाले तर इतर चार ते पाचजण जखमी झाले आहेत. स्फोट इतका जबरदस्त होता की काही क्षणातच बांधकाम चालू असलेल्या जहाजाने पेट घेतला. आगीच्या लोळाने आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला, एवढ रौद्ररुन आगीने घेतल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
आगीची खबर मिळताच वेर्णा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आगीच्या या महाकाय ज्वाळांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्यांना यश आले. गंभीररित्या जखमी झालेल्या कामगारांची नावे अशी : मूळ उत्तर प्रदेशातील अभिषेक कुमार (25), मूळ उत्तर प्रदेशातील मनिश चौहान (27), मूळ उत्तर प्रदेशातील संतोष कुमार (27), महम्मद बबलू (27) इतर तिघेजण आगीत होरपळल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेले आहेत, अशी माहिती मडगाव विभागाच्या पोलिस उपअधीक्षकांनी दिली. मात्र, मयतांची नावे उपलब्ध होऊ शकली नाहीत.
वेल्डिंगच्या कामामुळे लागली आग
ज्या जहाजाचे बांधकाम चालू होते, त्या जहाजातील एका बंदिस्त खोलीत वेल्डींगचे काम चालू होते. वेल्डींगचे काम चालू असताना या बंदिस्त खोलीत स्फोट होऊन आग भडकली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सुपरवायझरचा निष्काळजीपणा भोवला
सुरक्षिततेसाठी असलेल्या सुपरवायझरने दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनाला आले आहे. या निष्काळजीपणामुळे वेल्डींगच्यावेळी ही आग भडकली असा, आरोप तपास यंत्रणेने केलेला आहे. त्यामुळे सुपरवायझर या शिपयार्डमधील कामगारांच्या जीवाशी खेळला असल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. आगीच्या या दुर्घटनेसंबंधी मायणा- कुडतरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या 106, 115, 118 कलमाखाली गुन्हा नोंद केला असून तपास चालू असल्याची पोलिसांनी माहिती दिली.