For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑनलाईनद्वारे 2 कोटी 30 लाख घरपट्टी जमा

11:23 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑनलाईनद्वारे 2 कोटी 30 लाख घरपट्टी जमा
Advertisement

सर्व्हर-चलन समस्या असूनही बेळगावकरांनी भरला 5 कोटींहून अधिक कर : सवलत घेण्यासाठी केवळ आठवड्याची मुदत

Advertisement

बेळगाव : एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षामध्ये महानगरपालिकेने कर वसुलीवर भर देण्याचा प्रयत्न केला. मात्र सर्व्हरडाऊन तसेच नवीन निश्चित करण्यात आलेल्या दरामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. तरी देखील 1 एप्रिलपासून 22 एप्रिलपर्यंत एकूण 5 कोटी 12 लाख 50 हजार 816 रुपये घरपट्टी जमा झाली आहे. यामध्ये ऑनलाईनद्वारे 2 कोटी 30 लाख 1 हजार 509 रुपये जमा झाले आहेत. तर चलनद्वारे 2 कोटी 82 लाख 49 हजार 307 रुपये जमा झाले. महानगरपालिकेच्या आर्थिक वर्षाला एप्रिलपासून सुरुवात होते. एप्रिल महिन्यामध्ये घरपट्टी भरल्यास 5 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे घरपट्टी भरण्यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू असते. मात्र यावेळी ऑनलाईन घरपट्टी भरताना सर्व्हरडाऊन समस्या याचबरोबर शहरातील विविध भागांमध्ये नवीन करप्रणाली राबविण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांची घरपट्टी दुप्पटपेक्षाही अधिक झाली आहे. त्यामुळे घरपट्टी भरणे अनेकांना अशक्य झाले आहे. एकूण गेल्या 20 दिवसांपासून विविध समस्यांना तोंड देत अनेकांनी घरपट्टी भरली आहे. महानगरपालिकेची वेबसाईट बरेच दिवस बंद होती. अनेकवेळा सुरू असल्याचे सांगण्यात आले असले तरी सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. मात्र त्या वेबसाईटमधील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता घरपट्टी भरणे शक्य होत आहे, असे महसूल विभागातून सांगण्यात आले. आतापर्यंत ऑनलाईनद्वारे किती घरपट्टी जमा झाली? याचा लेखाजोगा घेतला असता 2 कोटी 30 लाख रुपये ऑनलाईनद्वारे जमा झाले आहेत.

ऑनलाईन समस्या निर्माण झाल्याने अनेक जण चलन घेऊन घरपट्टी भरण्यासाठी धडपडत होते. चलन घेण्यासाठी महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर लांबच्यालांब रांगा दिसत आहेत. सकाळी 9 वाजताच अनेक जण रांगेत थांबत आहेत. त्यानंतर चलन घेऊन घरपट्टी भरत आहेत. 5 टक्के सवलत घेण्यासाठी साऱ्यांचीच धडपड सुरू आहे. चलनद्वारे 2 कोटी 82 लाख 49 हजार 307 रुपये घरपट्टी जमा झाली आहे. अजूनही सवलत घेण्यासाठी एक आठवडा बाकी आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात घरपट्टी जमा होण्याची शक्यता आहे. एप्रिलच्या सुरुवातीपासूनच घरपट्टी भरताना समस्या निर्माण झाल्याने आणखी एक महिना वाढवून द्यावा, अशी मागणी विविध संघटना व जनतेतून केली आहे. त्यामुळे त्याबाबचा प्रस्ताव बेंगळूरला पाठवून देण्यात आला आहे, असे महानगरपालिकेच्या महसूल विभागातून सांगण्यात आले. मात्र नगर विकास खात्याकडून आदेश आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. बेळगाव वनमधून घरपट्टी भरण्यासाठी मुभा असली तरी थेट महानगरपालिकेच्या वेबसाईटवरच अधिक प्रमाणात घरपट्टी जमा होताना दिसत आहे. घरपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या वाढीव कराबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता दर हे नोंदणी कार्यालयाकडूनच निश्चित झाले आहेत. त्यामध्ये आम्हाला हस्तक्षेप करता येत नाही, असे सांगत आहेत.

Advertisement

शुन्याच्या घोळाने घरपट्टीधारकांना धक्का

घरपट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे. काही जणांची दुप्पट झाली तर काही जणांना पूर्वीपेक्षा 15 ते 20 टक्केच वाढ झाली आहे. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे एका शुन्यामुळे अनेकांना धक्का बसू लागला आहे. 800 रुपये असलेली घरपट्टी एक शून्य वाढल्याने 8 हजारांवर पोहोचली आहे. याबाबत विचारले असता त्याची दुरुस्ती करू, असे उत्तर दिले जात आहे. शहरातील विविध विभागांमध्ये कमी, अधिक दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे दुसऱ्यांची इतकी कमी तर आमची अधिक का? अशा तक्रारी महसूल विभागाकडे वाढल्या आहेत. त्यामुळे संबंधितांना उत्तर देताना कर्मचाऱ्यांना मात्र त्याचा त्रास होताना दिसत आहे.

Advertisement
Tags :

.