For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टक्का वाढला : 74.92 टक्के मतदान

11:07 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
टक्का वाढला   74 92 टक्के मतदान
Advertisement

बेळगाव 71.49 टक्के : चिकोडी 78.63 टक्के : बेळगावात 4  टक्क्यांनी तर चिकोडीत 3 टक्क्यांनी मतदानात वाढ

Advertisement

बेळगाव : बेळगाव, चिकोडी व कारवार या तीन लोकसभा मतदारसंघात विभागल्या गेलेल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये मंगळवारी झालेल्या निवडणुकीत 74.92 टक्के मतदान झाले. चिकोडी लोकसभा मतदारसंघात 78.63 टक्के, बेळगाव लोकसभा मतदारसंघात 71.49 टक्के तर कारवार लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या खानापूर विधानसभा मतदारसंघात 73.87 टक्के आणि कित्तूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 76.25 टक्के मतदान झाले आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकार आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघामध्ये 2019 च्या निवडणुकीत 75.52 टक्के मतदान झाले होते. 2024 च्या निवडणुकीत 78.63 टक्के मतदान झाले असून 3 टक्क्यांनी मतदान वाढले आहे. तसेच बेळगाव लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये 67.70 टक्के मतदान झाले होते. 2024 मध्ये 71.49 टक्के मतदान झाले असून 4 टक्क्यांनी मतदान वाढले आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यामध्ये सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होऊन सहा वाजेपर्यंत चालली. काही ठिकाणी सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. त्यामुळे टोकन देऊन मतदानासाठी सोय करून देण्यात आली होती. जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडल्याचे त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींकडून विविध मतदान केंद्राला भेट

Advertisement

जिल्ह्यामध्ये सुरू असलेली मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी पाच देशाच्या प्रतिनिधींनी गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याचा दौरा करीत आहेत. सदर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींकडून विविध मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रिया पाहिली. कंबोडीया, नेपाळ, मोलद्वा, शिसेल आणि ट्युनेशिया देशाच्या निवडणूक आयोगाच्या 10 प्रतिनिधींनी गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव जिल्ह्याला भेट देऊन निवडणुकीची प्रक्रिया पाहून माहिती घेत आहेत. याबरोबर सखी मतदार संघाला भेट देऊन विशेष माहिती घेतली.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी

बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 71.49 टक्के मतदान झाले आहे. या लोकसभा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे- अरभावी 71.92 टक्के, गोकाक, 71.31 टक्के, बेळगाव उत्तर 66.43 टक्के, बेळगाव दक्षिण 66.52 टक्के, बेळगाव ग्रामीण 76.88 टक्के, बैलहोंगल 73.58 टक्के, सौंदत्ती 76.73 टक्के, रामदुर्ग 73.60 टक्के, मतदान झाले आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघात एकूण 78.63 टक्के मतदान झाले आहे. या लोकसभा मतदारसंघात येणारे विधानसभा मतदारसंघ पुढीलप्रमाणे- निपाणी 79.98 टक्के, चिकोडी 79.59 टक्के, अथणी 78.37 टक्के, कागवाड 78.95 टक्के, कुडची 75.03 टक्के, रायबाग 76.02 टक्के, हुक्केरी 78.38 टक्के, यमकनमर्डी 82.21 टक्के मतदान झाले आहे.

मतदानयंत्रे स्ट्राँगरुममध्ये

मतदान निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक कर्मचाऱ्यांनी आपापल्या मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे पोलीस अधिकाऱ्यांच्या संरक्षणामध्ये संबंधित विधानसभा मतदारसंघातील डिमस्टरिंग केंद्रांमध्ये रात्री उशिरापर्यंत पाठविण्यात आली. डिमस्टरिंग केंद्रांतून सदर यंत्रे मतमोजणी केंद्रावर निर्माण करण्यात आलेल्या स्ट्राँगरुम येथे मध्यरात्रीपर्यंत पोहोचविण्यात आली. बेळगाव लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आरपीडी महाविद्यालय येथे केली जाणार आहे. तर चिकोडी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी चिकोडी येथील आर. डी. महाविद्यालय येथे करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित मतमोजणी केंद्रातील स्ट्राँगरुम येथे मतयंत्रे आणली जाणार आहेत. दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.

थेट प्रक्षेपण सुविधेनुसार संवेदनशील मतदान केंद्रांवर नजर

बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील पर्यवेक्षक एम. के. अरविंदकुमार आणि जे. एस. पांडा दास यांनी विविध मतदान केंद्राला भेट देऊन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. याबरोबरच थेट प्रक्षेपण सुविधेच्या माध्यमातून संवेदनशील मतदान केंद्रावर नजर ठेवली होती. जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील आणि चिकोडी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांकडून जनतेचे आभार

लोकसभा निवडणूक अत्यंत शांततामय आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केलेल्या जिल्ह्यातील नागरिकांचे, लोकप्रतिनिधींचे, राजकीय पक्ष, महसूल, जिल्हा पंचायत, पोलीस तसेच शासकीय खात्यांचे अधिकारी, कर्मचारी, स्वीप समितीच्या माध्यमातून मतदान जागृती करण्यासाठी सहभागी झालेल्या संघ-संस्था, सर्व प्रसारमाध्यमांचे जिल्हाधिकारी नितेश पाटील व चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी राहुल शिंदे यांनी आभार मानले आहेत.

Advertisement
Tags :

.