For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसाममध्ये अल-कायदाच्या 2 दहशतवाद्यांना अटक

06:33 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
आसाममध्ये अल कायदाच्या 2 दहशतवाद्यांना अटक
Advertisement

बांगलादेशी दहशतवाद्यांवर कारवाई : भारतात केली होती घुसखोरी

Advertisement

वृत्तसंस्था/ गुवाहाटी

आसाम पोलिसांनी मोठी कारवाई करत गुवाहाटी रेल्वे स्थानकावरून दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. दोन्ही दहशतवादी बांगलादेशी नागरिक असून त्यांना अवैध मार्गाने भारतात प्रवेश केला होता. तसेच ते मागील काही काळापासून भारतात वास्तव्य करत होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement

अटक करण्यात आलेले दोन्ही दहशतवादी हे अल-कायदा या प्रतिबंधित संघटनेचे सदस्य आहेत. देशाच्या युवांना कट्टरवादात लोटण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आसाममधील युवांना चिथावणी देण्याचे काम दोघेही करत होते असे पोलिसांनी सांगितले आहे.

बांगलादेशच्या ब्राह्मणबारी जिल्ह्यातील रहिवासी 30 वर्षीय बहार मियां आणि नेट्रोकोना जिल्ह्यातील रहिवासी 40 वर्षीय रसेल मियां अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत. अंसारुल्लाह बांगला टीम (एबीटी) या संघटनेशीही त्यांचा संबंध होता. एबीटी हा समूह अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंटशी संबंधित असल्याचे समजते.

बनावट आधारकार्ड हस्तगत

हे दहशतवादी बांगलादेशी नागरिक असून त्यांनी पासपोर्टशिवाय भारतात प्रवेश केला होता तसेच अवैधपणे वास्तव्य करत होते. स्वत:चे नेटवर्क फैलावण्यासाठी त्यांनी भारतीय ओळखपत्रेही मिळविली होती. पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांकडून आधारकार्ड्स हस्तगत केली आहेत. ही आधारकार्ड बनावट असल्याचा संशय आहे.

एबीटीविरोधात कारवाई

एबीटी हा दहशतवादी समूह भारतात स्वत:चे मॉड्यूल निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या समुहाचे दहशतवादी बांगलादेशातून भारतात घुसखोरी करत असल्याचे मागील काही काळात दिसून आले आहे. या दहशतवाद्यांच्या विरोधात पोलिसांकडून सातत्याने मोहीम राबविली जात आहे. मागील वर्षी आसाममध्ये एबीटीच्या मॉड्यूलचा भांडाफोड झाला होता.

Advertisement
Tags :

.