कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी 2 एकर जागा
मनपा आयुक्तांच्या प्रस्तावावरून हिरेबागेवाडीतील जागा जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर
बेळगाव : शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी अखेर हिरेबागेवाडी गावात 2 एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी पाठविलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मंजुरी दिल्याने गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. हिरेबागेवाडी गावातील गायरान जमीन सर्व्हे क्र. 431 मधील 2 एकर जागा यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय कचरा प्रकल्प केंद्रासाठी मंजूर केली होती. मात्र शहर आणि उपनगरात मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर बनली असल्याने त्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी प्रशस्त जागेची आवश्यकता होती. सध्या महापालिकेच्या पशुसंगोपन विभागाकडून श्रीनगर येथील गोशाळेतच कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले जाते. मात्र तेथील जागा शस्त्रक्रियेसाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे शहर व उपनगरात पकडलेली कुत्री एकाच ठिकाणी ठेवण्यासाठी निवारा केंद्राची मागणी यापूर्वी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक नितीन जाधव यांनी केली होती.
या मागणीला सभागृहाने पाठिंबा दर्शविल्याने महापौर मंगेश पवार यांनी सदर प्रस्ताव पारित करून जागा मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवावा, अशी सूचना मनपा आयुक्तांना केली होती. त्यानुसार आयुक्त शुभा बी. यांनी हिरेबागेवाडी येथील वैद्यकीय कचरा प्रक्रिया केंद्रासाठी मंजूर केलेली 2 एकर जागा कुत्र्यांच्या निर्बिजीकरण केंद्रासाठी मंजूर करावी, असा प्रस्ताव पाठविला. त्यामुळे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सुधारीत आदेश जारी करून हिरेबागेवाडी गावातील सर्व्हे नं. 431 मधील 2 एकर जागा अखेर निर्बिजीकरण केंद्रासाठी मंजूर केली आहे. जागा मंजूर झाल्याने त्या ठिकाणी लवकरच निवारा केंद्र उभारले जाणार आहे. भविष्यात श्रीनगर येथील गोशाळेत करण्यात येणारी कुत्र्यांवरील शस्त्रक्रिया हिरेबागेवाडीतील प्रशस्त जागेत केली जाणार आहे.