महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोवा डेअरीला 2.40 कोटीचा नफा

01:01 PM Sep 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

आमसभेत अध्यक्ष पराग नगर्सेकर यांची माहिती : दूध उत्पादकांना निवडणूक अधिकार रेंगाळला, पशुखाद्य प्रकल्पाबाबत सरकारचे उदासीन धोरण

Advertisement

फोंडा : गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघ (गोवा डेअरी) आर्थिक डबघाईतून सावरत असून सध्या चालू आर्थिक वर्षात 2 कोटी 40 लाख रुपये नफ्यात आल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक तथा प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांनी आमसभेत दिली. मारवासडा येथील पशुखाद्य प्रकल्प पशुसंवर्धन खात्याच्या स्वाधीन करून पुन्हा सुरू करण्याबाबत सरकारचे उदासीन धोरण दूध उत्पादकांना मारक ठरणारे आहे. तसेच अन्य विषयांवर समर्पक तोडगा न निघाल्याने काही विषयांना सोयीस्कर बगल देत सायंकाळपर्यंत लांबलेली आमसभा काल रविवारी झाली. कुर्टी-फोंडा येथील सहकार भवनात डेअरीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष पराग नगर्सेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही आमसभा घेण्यात आली. समितीचे सदस्य रामा परब, संदीप परब पार्सेकर उपस्थित होते. वार्षिक आमसभेला 166 सोसायट्यांपैकी  केवळ 86 सोसायट्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. गोवा डेअरीच्या चालू आर्थिक वर्ष 2024 च्या नवीन ऑडीटनुसार गोवा डेअरीस 2.40 कोटी रुपये नफा झाल्याची माहिती नगर्सेकर यांनी दिली.

Advertisement

 निवडणूक अधिकार रेंगाळला

डेअरीचे रोजचे दूध संकलन केवळ 40 हजार लिटर असून विक्री सुमारे 50 हजार लिटर एवढ्यावरच गोवा डेअरीची गाडी अजूनपर्यंत अडलेली आहे. प्रत्येक दूध उत्पादकाला गोवा डेअरीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत उतरण्याचा अधिकार बहाल करण्यात यावा, अशी मागणी आहे. त्यानुसार नियमावलीत व घटनेत बदल यावर चर्चा झाली. मात्र उपस्थित असलेल्या सोसायटीच्या प्रतिनिधींनी हिरीरीने कार्यवाही, पुढाकार व रूची न दाखविल्यामुळे तो विषय बारगळला. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध सोसायट्यांच्या प्रत्येक दूध उत्पादकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार देणार या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झाली नाही.

पशुखाद्य प्रकल्पाबाबत उदासीन  

मागील वर्षी गोवा डेअरीची एकत्रित नुकसानी वाढण्यास कारणीभूत ठरलेला मारवासडा उसगांव येथील पशुखाद्य प्रकल्प पशुसंवर्धन खात्याकडे देण्याविषयी पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्याविषयी सरकारने अजून प्रतिसाद दिलेला नाही. पशुखाद्य प्रकल्प ‘ना तोटा ना नफा’ या तत्त्वावर चालविणे आवश्यक आहे. दूध उत्पादकांना सवलतीच्या दरात पशुखाद्य मिळण्यासाठी हा प्रकल्प पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे, याबाबतची सरकारी उदासीनता या आमसभेत उघड झाली.

... तर आम्हालाही दूध दरवाढ द्यावी 

गोवा डेअरीतील कामगारांनी आपला महागाई भत्ता देण्याची मागणी केल्यानंतर दूध उत्पादकांनीही त्यांचा सूर चढविल्याचे चित्र पाहायला मिळाले. डेअरी कर्मचाऱ्यांना जर डीएच्या रूपात 3 टक्के वाढ देणे डेअरीला शक्य असेल तर दूध उत्पादकांनाही प्रति लिटर 3 रुपये दरवाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली. यावर अभ्यास करून पुढील कृती  ठरविण्यात येणार आहे. दूध उत्पादकांनी आमसभेचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात यावे, या मागणीची अंमलबजावणी या आमसभेत करण्यात आली.

एक वर्षासाठी गोवा डेअरीत एमडी

गोवा डेअरीकडे सध्या कायमस्वरूपी व्यवस्थापकीय संचालक नसून त्यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (एनडीडीबी)तर्फे एक वर्षाच्या कालावधीसाठी गोवा डेअरीवर एमडीची नेमणूक करण्यात येणार आहे. एमडीच्या वेतनाची जबाबदारीही एनडीडीबीने स्वीकारलेली आहे. तसेच त्याच्या टिमकडून डेअरीच्या उत्कर्षासाठी अभ्यास करण्यात येईल. वर्षाअखेरीस सूचना आमसभेत मांडण्यात येणार असल्याची माहिती नगर्सेकर यांनी दिली.

 ‘गोवा डेअरी नफ्यात, दूध उत्पादक तोट्यात’ : शिरोडकर

आमसभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दूध उत्पादक तथा डेअरीचे माजी अध्यक्ष दुर्गेश शिरोडकर म्हणाले की, गोवा डेअरीचे दूध संकलन व मार्केटिंग टिमचे कार्य शून्य झालेले आहे. डेअरीला दूध संकलनात तसेच दूध विक्रीतही वाढ करणे अद्याप शक्य झालेले नाही. त्यामुळे डेअरीची प्रगती मंदावलेली आहे. सकारात्मक गोष्ट म्हणजे डेअरीच्या ऑडीटरने चोख भूमिका बजावलेली आहे. तसेच डेअरीकडून दूध पोचते झाल्याचा रिपोर्ट मोबाईल संदेशाद्वारे दूध उत्पादकांना कळण्याची सूचना उत्तम सोय केली आहे. परंतू जोपर्यत दूध संकलन व दूध विक्रीत यश येत नाही तोपर्यंत राज्यातील दूध उत्पादकांना दरवाढ मिळणे कठीण काम आहे. वाढत्या महागाईमुळे दूध उत्पादकांनी व्यवसाय सोडून दिलेला आहे, त्या दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी डेअरीचे कोणतेच कार्य दिसत नाही. दूध उत्पादकांच्या हितासाठी पशुखाद्य प्रकल्प त्वरित सुरू करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे. ‘डेअरी नफ्यात दूध उत्पादक तोट्यात’ अशी परिस्थिती उद्भवण्यापूर्वी सावरणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत शिरोडकर यांनी मांडले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia