मार्गशीर्ष गुरुवार उद्यापासून
आज चंपाषष्ठी, सोमवारी गीता जयंती; पुढील गुरुवारी दत्तात्रेय जन्मोत्सव
बेळगाव : मार्गशीर्ष महिन्याला शुक्रवारपासून (दि. 21) सुरुवात झाली आहे. या महिन्यात लक्ष्मीचा वार म्हणून अनेक महिला गुरुवारचे व्रत करीत असतात. या व्रताला वैभवलक्ष्मी व्रत असे म्हटले जाते. देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख-समृद्धी व ऐश्वर्य प्राप्त होते, अशी अनेकांची धारणा असून महिला आवर्जुन हे व्रत करीत असतात. यंदा 27 नोव्हेंबर व 4, 11 आणि 18 डिसेंबरला मार्गशीर्ष गुरुवार आहे. हा महिना भगवान विष्णू आणि त्यांचे अवतार भगवान श्रीकृष्ण यांना खूप प्रिय आहे. अध्यात्मिक शुद्धीकरण व भक्तीसाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली. मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल षष्ठी (चंपाषष्ठी), शुक्ल एकादशी (गीता जयंती) व पौर्णिमा (दत्तात्रेय जयंती) हे महत्त्वाचे दिवस आहेत.
चंप़ाषष्ठी
मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला चंपाषष्ठी असे म्हटले जात असून बुधवारी (दि. 26) चंपाषष्ठी आहे. खंडोबा देवस्थानच्या ठिकाणी चंपाषष्ठी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते षष्ठी असे सहा दिवसांचे खंड़ोबाचे नवरात्रही होते. याला चंपाषष्ठीचे नवरात्र असे म्हटले आहे. श्रीशंकरांनी खंडोबाचा अवतार घेऊन माणिमल्ल नावाच्या राक्षसाचा वध केला. तो दिवस मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीचा होता, असा उल्लेख पुराणात आढळून येतो. तेव्हापासून चंपाषष्ठी साजरी करण्याचा प्रघात सुरू झाला आहे.
गीता जयंती
मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हटले आहे. या दिवशी भगवद्गगीतेचा जन्म झाला, असे सांगण्यात येते. हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. सोमवार दि. 1 डिसेंबरला गीता जयंती आहे. कौरव-पांडव युद्धात समोर आपले आप्त-स्वकीय पाहून अर्जुनाला उपरती आली. आपल्याच लोकांशी युद्ध कसे करायचे, असा प्रश्न त्याला पडला. त्यावेळी श्रीकृष्णांनी धर्माचे पालन करण्यासाठी तत्वज्ञान सांगणारा उपदेश केला. तो दिवस मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचा होता. हा दिवस भगवद्गगीतेचा जन्मदिवस असल्याचे म्हटले आहे. भगवद्गगीतेमध्ये जीवनाचे तत्वज्ञान मांडण्यात आले आहे.
दत्तात्रेय जन्मोत्सव
मार्गशीर्ष पौर्णिमा ही दत्तात्रेय जयंती म्हणून साजरी होते. मंदिरांतून सायंकाळी जन्मोत्सव साजरा केला जातो. पौर्णिमेच्या आधी सात दिवस श्रीगुऊचरित्राचे पारायण होते. अनेक भक्त यामध्ये सहभागी होऊन श्रीगुरुचरित्राचे वाचन करतात. जन्मोत्सवाच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला श्रीदत्त जन्माच्या अध्यायाचे वाचन केले जाते. दत्त महाराजांची ठिकाणे असलेल्या औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर आदी स्थळांवर जन्मोत्सव मोठ्याने होत असतो. गुरुवार दि. 4 डिसेंबरला दत्तजयंती आहे.