कारवार जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 198 कोटी रुपयांची हानी
कारवार : जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा 81 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.जूनपासून आजअखेर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात 198 कोटी रुपयांची हानी झाली आहे, अशी माहिती कारवार जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जुलै महिन्यात सरासरी 993.4 मि.मी. पावसाची नोंद कारवार जिल्ह्यात होत असते. तथापि यावर्षी जुलै महिन्यात सरासरी 1798.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यावर्षी जुलै महिन्यात 81 टक्के इतक्या पावसाची नोंद झाली आहे. 1 जानेवारीपासून जिल्ह्यात सरासरी 1882.3 मि.मी. इतक्या पावसाची नोंद होत असते. तथापि यावर्षी 1 जानेवारीपासून जुलै अखेरपर्यंत 2745.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यावर्षी एक जानेवारीपासून जुलैअखेर 46 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.
मुसळधार पावसामुळे 13 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना 65 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. पावसामुळे पडझड झालेल्या 201 घरांपैकी 148 घरांच्या मालकांना एक कोटी 52 लाख 40 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. अंशत: हानी झालेल्या 724 घरांपैकी 449 घरमालकांना 24 लाख 44 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. पावसामुळे 22 जनावरे दगावली असून जनावरांच्या मालकांना 5 लाख 22 हजार रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात आली आहे. 383 हेक्टर कृषी भूमीवरील पिकांची आणि 21.51 हेक्टर बागायती पिकांची हानी झाली आहे. हानीचा आढावा घेतला जात आहे,
असे स्पष्ट करून जिल्हा प्रशासनाने पुढे असे म्हटले आहे की, जिल्ह्यात यावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे 291 अंगणवाडी इमारतींचे 643.50 लाख रुपये, 556 शाळा इमारतींचे 1529.60 लाख रुपये, नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे 21 लाख रुपयांचे, 114 पुलांचे 3138.70 लाख रुपयांचे, 398 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे 2778.15 लाख रुपयांचे, 191 कि.मी. लांबीच्या राज्य हमरस्त्यांचे आणि जिल्हा मुख्य रस्त्यांचे 11 हजार 642 लाख रुपयांचे असे एकूण 197 कोटी 52 लाख 95 हजार रुपयाची हानी झाली आहे. जिल्ह्यात जून-जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे हेस्कॉमच्या मालकीचे 4 हजार 667 विद्युतखांब कोसळले आहेत. शिवाय 374 ट्रान्स्फॉर्मरची हानी झाली आहे. इतकेच नव्हेतर पावसामुळे 204.83 कि.मी. लांबीच्या विद्युत वाहिन्यांची हानी झाल्याची माहिती पुढे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.