19 वर्षीय सॅम कोन्स्टासची ऑस्ट्रेलियन संघात एंट्री
मेलबर्न-सिडनी कसोटीसाठी दोन बदल : जोश हेजलवूड, मॅकस्विनी संघाबाहेर
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाविरुद्ध मालिकेतील शेवटच्या 2 कसोटी सामन्यांसाठी आपला संघ जाहीर केला असून त्यात 2 मोठे बदल करण्यात आले आहेत. पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाकडून सलामीसाठी उस्मान ख्वाजाच्या साथ देणाऱ्या नॅथन मॅकस्विनीला निवडकर्त्यांनी शेवटच्या 2 सामन्यांसाठी संघातून वगळले आहे. त्याच्या जागी 19 वर्षीय युवा फलंदाज सॅम कोन्स्टासची संघात एंट्री झाली आहे. तसेच दुखापतीमुळे जोश हेजलवूड उर्वरित दोन्ही कसोटीला मुकणार आहे.
भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टर इलेव्हन संघाकडून गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात शतक झळकावण्यात यशस्वी झालेला 19 वर्षीय सलामीवीर सॅम कोन्स्टासचा आगामी 2 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी नॅथन मॅकस्विनीच्या जागी सॅमला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, जो मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमध्ये फलंदाजीत चांगली कामगिरी करु शकला नाही. कोन्स्टासला भारताविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाल्यास तो पॅट कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. कमिन्सने 2011 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत पदार्पण केले त्यावेळी तो 18 वर्षे 193 दिवस वयाचा होता.
दुखापतीमुळे हेजलवूड मेलबर्न-सिडनी कसोटीला मुकणार
दुखापतीने त्रस्त असलेल्या जोश हेजलवूडलाही संघात स्थान मिळालेले नाही. हेजलवूडच्या दुखापतीवर निवड समितीचे बारकाईने लक्ष असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले. याशिवाय वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनचे तीन वर्षानंतर ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे. रिचर्डसनने अॅशेस मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 2021 मध्ये अॅडलेड मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळला होता. दरम्यान, दुखापतग्रस्त गोलंदाज हेजलवूडच्या जागी सीन अॅबॉटचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, स्कॉट बोलँडलाही 15 सदस्यीय संघात स्थान देण्यात आल्याचे ऑस्ट्रेलियन निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितले.
शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), सीन अॅबॉट, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, बॉ वेबस्टर.