19कोटी वर्षे जुने अद्भूत स्थळ
एकावेळी केवळ 64 जणांना जाण्याची अनुमती
जगात अशा अनेक अनोख्या गोष्टी आहेत, ज्या पाहून त्या एखाद्या परग्रहावर असल्याचा भास होतो. अशाच एका ठिकाणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात छोटे छोटे पर्वत दिसून येत असून त्यातील खडकांवर समुद्राच्या लाटांप्रमाणे आकृत्या दिसून येतात. हे ठिकाण 1-2 नव्हे तर 19 कोटी वर्षे जुने आहे.
या ठिकाणाचा व्हिडिओ अलिकडेच पोस्ट करण्यात आला आहे. यात काही लोक एका मोठ्या परंतु अजब ठिकाण फिरताना दिसून येतात. या ठिकाणी छोटे छोटे पर्वत असून त्यावर लाटांसारख्या आकृत्या दिसून येतात, त्यामुळे समुद्राच्या ठिकाणी पोहोचल्याचा भास होतो. या ठिकाणाचे नाव वेव आहे आणि हे अमेरिकेतील अॅरिझोना प्रांतात आहे. हे ठिकाण 19 कोटी वर्षे जुने असून ते पाहण्यासाठी लाखो लोक येत असतात.
परंतु येथे प्रत्येकाला एकाचवेळी जाण्याची संधी मिळत नाही. एकावेळी केवळ 64 लोकांना येथे हाइक करण्याची संधी मिळते आणि याकरता पूर्वनेंदणी करावी लागते. येथे आयर्न ऑक्साइड, मॅगनीज, कॅल्शियम यासारखी अनेक खनिजं आढळून येतात. युएस ब्यूरो ऑफ लँड मॅनेजमेंटकडून परवानगी मिळाल्यावरच येथे जाता येते.
या ठिकाणाच्या व्हिडिओला 18 लाख ह्यूज मिळाल्या आहेत. तर अनेक लोकांनी यावर कॉमेंट केली आहे. हे तर जणू विंडोज मायक्रोसॉफ्टचा वॉलपेपर वाटत असल्याचे लोकांनी म्हटले आहे. तर या ठिकाणी जाण्यासाठीची प्रक्रिया अनेकांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.