18 हजार शिक्षकांची नियुक्ती करणार
शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा : बेंगळुरात राज्यपातळीवरील शिक्षक दिन साजरा
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात 18 हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री मधु बंगारप्पा यांनी दिली. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग आणि उच्च शिक्षण विभागाने विधानसौधच्या बँक्वेट हॉलमध्ये आयोजित भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण जन्मदिन समारंभाच्या भाग म्हणून राज्यस्तरीय शिक्षक दिन समारंभ आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांच्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
मंत्री बंगारप्पा पुढे म्हणाले, कलबुर्गी प्रदेशात 5 हजार शिक्षकांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आहे. 800 केपीएससी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 5 हजार द्विभाषिक शाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. एलकेजी, यूकेजी शाळा 1 हजारावरून 4 हजारपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत. माध्यमिक शाळा आणि पदवीपूर्व कॉलेजांनाही मान्यता देण्यात आली आहे. 6 दिवसांपर्यंत मुलांना शारीरिक तंदुऊस्ती वाढविण्यासाठी अंडी किंवा केळी दिली जात आहेत. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर शाळांच्या मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, शिक्षणमंत्र्यांनी शालेय विद्यार्थ्यांना संविधानाची प्रस्तावना वाचून दाखवली. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
अझीम प्रेमजी फाउंडेशनकडून 110 कोटी रु. शिष्यवृत्ती
उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी अझीम प्रेमजी फाउंडेशन राज्यातील 36,000 मुलींना दरवषी 30,000 रुपये शिष्यवृत्ती देणार आहे, असे मंत्री डॉ. एम. सी. सुधाकर यांनी सांगितले. सरकारी शाळेत दहावी पूर्ण केलेल्या आणि सरकारी महाविद्यालयात पीयूसी स्तरावरील शिक्षण घेतलेल्या मुलींना पीयूसीनंतरचे उच्च शिक्षण देण्यासाठी अझीम प्रेमजी फाउंडेशन दरवषी 110 कोटी रुपये शिष्यवृत्ती देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारकडून शिक्षणावर 65 हजार कोटी खर्च : मुख्यमंत्री
शिक्षण हा आमच्या सरकारचा प्राधान्यक्रम असलेला कार्यक्रम आहे. दरवषी शिक्षणावर 65 हजार कोटी ऊपये खर्च केले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. राज्यस्तरीय शिक्षक दिन समारंभात मुख्यमंत्र्यांनी राज्य पुरस्कार विजेत्या शिक्षकांना पुरस्कार प्रदान करून त्यांचे अभिनंदन केले. आपण राजप्पा मास्तरांकडून शालेय शिक्षण आणि प्राध्यापक नंजुंडास्वामी यांच्याकडून राजकारण शिकल्याची मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिक्षकांची आठवण करून देत दोघांचेही आभार मानले.