हार्वर्डसाठीचे 18 हजार कोटीचे अनुदान रोखले
ट्रम्प यांचा महत्त्वाचा निर्णय : अमेरिकेच्या अध्यक्षांच्या कृतीला विद्यापीठाचा विरोध
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हार्वर्ड विद्यापीठाचे 2.2 अब्ज डॉलर्सचे (सुमारे 18 हजार कोटी रुपये) अनुदान रोखले आहे. हार्वर्डने विद्यापीठ परिसरात ज्यूविरोधी कारवाया रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास नकार दिल्याने ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाचे प्रशासन, प्रवेश आणि भरती प्रक्रिया सरकारच्या नियंत्रणात यावी आणि यात मोठे बदल केले जावेत अशा मागण्या ट्रम्प प्रशासनाने 3 एप्रिल रोजी विद्यापीठासमोर ठेवल्या होत्या. याचबरोबर डायवर्सिटी ऑफिस बंद करणे आणि विदेशी विद्यार्थ्यांच्या चौकशीत इमिग्रेशन अधिकाऱ्यांना मदत करण्याची मागणीही करण्यात आली होती. हार्वर्डने या मागण्यांना बेकायदेशीर आणि घटनाविरोधी ठरवत त्या नाकारल्या होत्या. यानंतर ट्रम्प प्रशासनाने 2 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संघीय निधी रोखला जात असल्याचे हार्वर्डला कळविले आहे.
झुकणार नाही : हार्वर्ड अध्यक्ष
विद्यापीठ प्रशासनासमोर झुकणार नाही आणि स्वत:चे स्वातंत्र्य आणि घटनात्मक अधिकारांवरून कुठलीही तडजोड करणार नाही असे हार्वर्ड अध्यक्ष एल गारबर यांनी विद्यार्थी आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. कुठलेही सरकार किंवा सत्तेवर असलेला पक्ष खासगी विद्यापीठ का शिकवू शकते, कुणाला प्रवेश किंवा नोकरी देऊ शकते किंवा कुठल्या विषयावर संशोधन करू शकते हे ठरवू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
विद्यापीठाचे वक्तव्य चिंताजनक
याच्या प्रत्युत्तरादाखल ट्रम्प यांच्या ‘जॉइंट टास्क फोर्स टू कॉम्बॅट एंटी-सेमिटिज्म’ने वक्तव्य जारी करत हार्वर्डला मिळणारी 2.2 अब्ज डॉलर्सचा बहुवार्षिक निधी आणि 6 कोटी डॉलर्सच्या शासकीय कंत्राटाचे वित्तसहाय्य रोखण्यात आल्याचे सांगितले. हार्वर्डचे वक्तव्य आमच्या देशाच्या सर्वात चांगल्या विद्यापीठ आणि कॉलेजमध्ये फैलावलेली एक चिंताजनक मानसिकता दर्शविते. या विद्यापीठांना सरकारी निधी मिळवायचा आहे, परंतु कायद्यांचे पालन करण्याची जबाबदारी त्यांना स्वीकारायची नसल्याचे यातून स्पष्ट होते. मागील काही वर्षांमध्ये विद्यापीठ परिसरात शिक्षणात अडथळे निर्माण झाले असून ते आम्हाला मंजूर नाहीत. ज्यू विद्यार्थ्यांचा छळ सहन केला जाऊ शकत नाही. आघाडीच्या विद्यापीठांनी या समस्येला गांभीर्याने घेण्याची वेळ आली असल्याचे टास्क फोर्सने म्हटले आहे.
विद्यापीठात फडकला पॅलेस्टिनी ध्वज
गाझामध्ये जारी इस्रायल-हमास युद्धाच्या विरोधात मागील वर्षी अमेरिकेच्या अनेक विद्यापीठांमध्ये पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ निदर्शने झाली होती. या निदर्शनांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. याप्रकरणी 100 हून अधिक विद्यार्थ्यांना अटक झाली आहे. यादरम्यान हार्वर्ड विद्यापीठात विद्यार्थ्यांनी पॅलेस्टिनी ध्वज फडकविला होता.