उत्तर प्रदेशात साकारणार 18 फुटबॉल स्टेडियम
827 फुटबॉल मैदानेही तयार करणार : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची घोषणा
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यात 18 फुटबॉल स्टेडियम बांधण्याची योजना जाहीर केली आहे. या सुंदर खेळाला आणखी चालना देण्यासाठी तसेच राज्यात फुटबॉलच्या पुरेशा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यभरातील प्रत्येक गटात अशा प्रकारे 827 फुटबॉल मैदाने तयार केली जातील. यामुळे आणखी स्पर्धांचे आयोजन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लखनौ येथील मोहन बागान सुपर जायंट व ईस्ट बंगाल एफसी सामन्यापूर्वी सांगितले की, 8 ऑगस्ट रोजी मला उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्याचे सौभाग्य मिळाले. त्यांचे फुटबॉलबद्दलचे प्रेम आणि समर्पण लक्षात आल्यानंतर मी त्यांना जर ‘डर्बी’सारखा सामना लखनौमध्ये खेळला गेला, तर उत्तर प्रदेशात फुटबॉलच्या विकासासाठी मदत करेल अशी विनंती केली होती. त्यादृष्टीने के. डी. सिंग बाबू स्टेडियमचे नूतनीकरण करण्यास सरकारने केवळ 19 दिवस घेतले. लखनौ शहरातील फुटबॉलप्रेमींच्या दृष्टीने ही खूप सुखद बाब आहे, असे ते म्हणाले.
सोमवारी के. डी. सिंग बाबू स्टेडियमने लखनौमध्ये पहिली कोलकाता डर्बी आयोजित केली, जी ऐतिहासिक ठरली. त्यात मोहन बागान सुपर जायंटने ईस्ट बंगाल एफसीला पेनल्टीवर पराभूत केले. यावेळी स्टेडियममध्ये जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी म्हणाले की, हा प्रतिष्ठित सामना राज्याची राजधानी लखनौमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेला असून हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तीन आठवड्यांपूर्वी जेव्हा मी चौबे यांना भेटलो तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये फुटबॉलला लोकप्रिय करण्यासाठी एक मंच मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती. या खेळाला सरकारचा पाठिंबा मिळाल्यास या प्रक्रियेला गती मिळू शकेल असेही त्यांनी म्हटले होते, असे योगी यांनी सांगितले.