For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विमान कोसळून 179 जणांचा मृत्यू

06:58 AM Dec 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
विमान कोसळून 179 जणांचा मृत्यू
Advertisement

दक्षिण कोरियातील दुर्घटना : लँडिंग करताना विमानतळाच्या हद्दीत स्फोट

Advertisement

वृत्तसंस्था/ सोल

दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर रविवारी जेजू एअरलाईन्सचे विमान कोसळले. विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्ससह 181 लोक होते. यापैकी 179 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचाव पथकाला केवळ दोघांना वाचविण्यात यश आले आहे. त्यांची प्रकृतीही अतिगंभीर असल्याचे सांगण्यात आले. मृतांमध्ये 82 पुरुष आणि 84 महिलांचा समावेश आहे. 13 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघातानंतर विमानतळावरील वाहतूक बंद करत सर्व स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय उ•ाणे रद्द करण्यात आली. दक्षिण कोरियाच्या इतिहासात आजपर्यंतचा हा सर्वात भीषण विमान अपघात असल्याची माहिती देण्यात आली.

Advertisement

भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे 5:37 वाजता (स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:07) हा अपघात झाला. बँकॉकहून येणारे विमान मुआन विमानतळावर उतरणार होते, मात्र लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमानाची चाके उघडली नाहीत. विमानाचे बेली लँडिंग आपत्कालीन परिस्थितीत करण्यात आले. यामध्ये विमानाचे शरीर थेट धावपट्टीवर आदळते. लँडिंगवेळी विमान धावपट्टीवरून घसरले आणि विमानतळाच्या संरक्षक भिंतीला धडकले. त्यानंतर स्फोट होऊन आग लागली. अपघातापूर्वी, मुआन विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून (एटीसी) विमानाची पक्ष्याला धडक बसल्यासंबंधी अलर्ट पाठविला गेला होता. विमानाच्या लँडिंग गियरमध्ये बिघाड होण्याचे हे देखील एक कारण असू शकते, असे सांगण्यात आले. विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये 173 दक्षिण कोरियाचे आणि 2 थायलंडचे नागरिक होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वाचलेले दोघेही क्रू मेंबर्स आहेत.

विमानाचा दोनवेळा उतरण्याचा प्रयत्न

अपघातग्रस्त जेजू एअरलाईन्सचे विमान अमेरिकन कंपनी बोईंगचे 737-800 विमान होते. विमानाने विमानतळावर दोनदा उतरण्याचा प्रयत्न केला. लँडिंग गिअर न उघडल्याने विमान पहिल्यांदा उतरू शकले नाही. यानंतर विमानाने विमानतळाला प्रदक्षिणा घातली. दुसऱ्यांदा वैमानिकाने लँडिंग गिअरशिवाय विमान बेली लँड करण्याचा निर्णय घेतला. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पक्षी विमानाच्या पंखाला आदळल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे लँडिंग गिअर खराब झाले आणि लँडिंग करताना उघडता आले नाही, असे सांगितले जात आहे.

 

पाऊण तासात आगीवर नियंत्रण

विमान विमानतळावर उतरल्यानंतर काही सेकंदातच ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागल्यानंतर विमानातील आग आटोक्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. बचाव पथकाला आग विझवण्यासाठी 43 मिनिटे लागली. मात्र, आग नियंत्रणात येईपर्यंत बहुतांश लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. बचावकार्यादरम्यान बहुतांश मृतदेह विमानाच्या मागील बाजूस होते, असे मुआन विमानतळाच्या अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.

जेजू एअरच्या सीईओची अपघाताबद्दल माफी

जेजू एअरचे सीईओ किम ई-बे यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून लोकांची माफी मागितली आहे. ‘दुर्घटनामागील कारण काहीही असो, मी सीईओ म्हणून संपूर्ण जबाबदारी घेतो’, असे किम यांनी स्पष्ट केले. मदत आणि बचावासाठी एअरलाईन्स सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत होते. हे विमान यापूर्वी कधीही कोसळले नाही.

Advertisement
Tags :

.