174 विमान प्रवासी बालंबाल बचावले
16 हजार फूट उंचीवर खिडकी उघडली : विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
वृत्तसंस्था/ पोर्टलँड
अमेरिकेतील पोर्टलँड येथे एक प्रवासी विमान नुकतेच मोठ्या अपघातातून थोडक्मयात बचावले. उड्डा ण करताना विमानाची खिडकी तुटल्यामुळे 174 प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्याचा बाका प्रसंग आला होता. मात्र, पायलटने विमानाने सुरक्षितपणे इमर्जन्सी लँडिंग केल्यामुळे सर्व प्रवासी बालंबाल बचावले. प्रवाशांच्या तक्रारीनंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हा अपघात हवेत 16,000 फूट उंचीवर झाला. याप्रसंगी विमानात 174 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. यासंबंधीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
अमेरिकेत घडलेली ही घटना 5 जानेवारीची आहे. अलास्का एअरलाईन्सचे फ्लाइट 1282 पोर्टलँड, पॅलिफोर्निया येथून ओंटारियोला जात होते. उड्डाणानंतर काही वेळातच हा अपघात झाला. फ्लाईटच्या एका बाजूचा दरवाजा आणि त्याला लागून असलेली रिकामी सीट अचानक उखडून हवेत उडाली. त्यानंतर विमान इमर्जन्सी लँडिंगसाठी पोर्टलँड आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत आणण्यात आल्याचे अलास्का एअरलाईन्सने सांगितले. यादरम्यान प्रवाशांना ऑक्सिजन मास्कचा वापर करून सावधगिरी बाळगण्याच्या सूचना क्रू मेंबर्सकडून देण्यात आल्या होत्या.
अलास्का एअरलाईन्सने बोईंग 737-9 मालिकेचे विमान उड्डाण दरम्यान खिडकी आणि त्याच्या मुख्य भागाचा काही भाग खराब झाल्यानंतर काही तासांनी ग्राउंड केले आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच खिडकीच्या एका छिद्रामुळे केबिनमधील दाब कमी झाला. याशिवाय विमानाच्या मुख्य भागाच्या काही भागाचेही नुकसान झाले आहे. या घटनेनंतर पर्यायी विमानाने सर्व प्रवाशांना निर्धारित ठिकाणी रवाना करण्यात आले. यावेळी विमानातील प्रवाशांनी याला दु:स्वप्न असे संबोधत आपले वेदनादायक अनुभव कथन केले आहेत.
एअरलाईन्सने काय म्हटले?
घटनेचा तपास करण्यात येत आहे. यामागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. अधिक माहिती मिळाल्यावर एअरलाईन्स माहिती सामायिक करेल, असे अलास्का एअरलाईन्सने सांगितले. ही घटना अत्यंत दुर्मिळ असून अशा परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी फ्लाईट क्रूला प्रशिक्षण देण्यात आले होते, असेही सांगण्यात आले. तसेच विमान उत्पादक कंपनी बोईंगने या प्रकरणाची माहिती गोळा करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. बोईंगचे तांत्रिक पथक तपासात सहकार्य करण्यास तयार आहे.