1700 वर्षे जुने लक्झरी बाथ हाउस
तुर्कियेत उत्खननादरम्यान 1700 वर्षे जुने एक आलिशान रोमन स्नानगृह म्हणजेच बाथहाउस मिळाले आहे. शतकांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या बाथ हाउसमध्ये स्पा, पाणी गरम करण्यासारखी हिटिंग सिस्टीम आणि अस्वच्छ पाण्याला बाहेर काढण्यासाठी वेगळा चॅनेल यासारख्या सुविधा होत्या. पुरातत्वतज्ञांनी अलिकडेच तुर्कियेत प्राचीन रोमन स्नानगृह शोधले आहे. याचे अवशेष जितके जुने आहेत, तितकेच आलिशान आहेत. 2023 मध्ये एक शेतकरी स्वत:च्या शेतात रोपांची लागवड करत असताना त्याची नजर रोमन युगातील मोजेकवर पडली. अंडरग्राउंड इमेजिंग रडारच्या मदतीने पुरातत्व तज्ञांना मेजेकपासून सुमारे 230 फूट अंतरावर दक्षिणेत स्नानगृह मिळाले आहे.
1700 वर्षे जुन्या या संरचनेचे क्षेत्रफळ 75 चौरस मीटर आहे. हे रोमन काळाच्या अंतिम काळातील असल्याचे सांगण्यात येत आहे. यात फरशीखाली हिटिंग सिस्टीम आणि वेगवेगळी थंड, गरम क्षेत्रे होते, जी आधुनिक स्पाच्या प्राचीन समकक्ष होती. स्नानगृहात घाम वाहण्यासाठी कक्ष, पूल आणि स्वच्छ जल तसेच अस्वच्छ जलासाठी वेगवेगळ्या वाहिन्या होत्या. तुर्कियेचे अधिकारी भविष्यात या स्थळाला पर्यटनासाठी खुले करण्याची योजना आखत आहेत. स्नानगृह आणि मोजेक या क्षेत्रात असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण अवशेषांपैकी एक आहे. हे क्षेत्र एक शहरी वस्ती होती, असे आमचे मानणे आहे, यामुळे आम्ही उत्खनन सुरू ठेवणार आहोत, असे प्रांतीय संस्कृती आणि पर्यटन संचालक अहमद डेमिरदाग यांनी म्हटले.
प्लॅन्ड इंजिनियरिंगसोबत कायम संरचना
हे स्नानगृह संभाव्यपणे या क्षेत्रातील अशाप्रकारचे पहिले स्नानगृह आहे. बाथ हाउसचे थंड आणि गरम हिस्से स्वत:च्या पूर्ण प्लॅन्ड इंजिनियरिंगसह कायम आहेत. यामुळे हे स्नानगृह वास्तवात एक विशिष्ट आणि महत्त्वपूर्ण संरचना असल्याचे उत्खनन स्थळाचे पुरातत्वतज्ञ एमरे चायर यांनी सांगितले आहे. हे बाथ हाउस अलिकडच्या महिन्यांमध्ये तुर्कियेत करण्यात आलेल्या अनेक आकर्षक शोधांपैकी एक आहे.