17 वर्षांपासून केवळ कोल्ड्रिंकवर जगतोय
अनेक वर्षांपासून जेवलाच नाही
कधी भूकच लागत नसल्याचा दावा एका इसमाने केला आहे. मागील 17 वर्षांपासून हा इसम केवळ कोल्ड्रिंग पिऊन जगत आहे. 2006 मध्ये त्याने जेवण करणे सोडून दिले होते. दिवसातून केवळ 4 तासांची झोप घेत असल्याचेही त्याचे सांगणे आहे. त्याच्या दाव्यावर लोक अनेक प्रकारच्या चर्चा करत आहेत. हा अजब इसम इराणचा नागरिक आहे.
या इसमाचे नाव घोलमरेजा अर्देशिरी आहे. मागील 17 वर्षांपासून तोंडात अन्नाचा एक कण टाकला नसल्याचा दावा त्याने केला आहे. अर्देशिरी पूर्ण दिवस केवळ पेप्सी किंवा 7अप पिऊन घालवतो. कोल्ड्रिंक पिऊन केवळ तो जिवंत आहे असे नाही तर एकदम तंदुरुस्त देखील आहे.
फायबर ग्लास रिपेयरिंगचे काम करणारे अर्देशिरी यांनी आपल्या पोटात केवळ कोल्ड्रिंक्सच पचत असल्याचे सांगतात. अन्य काही आहार घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना उलटी होऊ लागते. 2006 मध्ये अखेरचे ते जेवले होते. तेव्हापासून ते केवळ कोल्ड्रिंक्स पिऊन जीवन जगत आहेत. अर्देशिरी यांच्यानुसार पेप्सी अन् 7अप यासारख कार्बोनेटेड ड्रिंकमुळे मिळणारी ऊर्जा त्यांना जिवंत ठेवत आहे आणि पोट भरण्यासाठी पुरेशी आहे.
स्वत:च्या या स्थितीकरता डॉक्टरांशी संपर्क साधला होता. डॉक्टरांनी हा केवळ मनाचा खेळ असल्याचे निदान केले होते. जेव्हा कधी मी काही खाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तोंडात केस जात असल्याचे वाटते असे अर्देशिरी यांनी डॉक्टरांना सांगितले होते. परंतु कोल्ड्रिंकचे सेवन करताना अशी कुठलीच समस्या होत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.
मानसोपचारतज्ञाकडे जाण्याची सूचना डॉक्टरांनी अर्देशिरी यांना केली आहे. अर्देशिरी यांना अद्याप स्वत:च्या भूकेतील बदलाचे कारण उमगलेले नाही. तज्ञांनुसार स्थुलत्व आणि रक्तशर्करता वाढविण्यात कोल्ड्रिंक्सची मोठी भूमिका असते. याचमुळे अत्यंत कमी प्रमाणात त्यांच्या सेवनाचा सल्ला दिला जात असतो.