पाकिस्तानात 17 वर्षीय टिकटॉक स्टार सनाची हत्या
जन्मदिनी घरात घुसून झाडल्या गोळ्या : पाहुण्याच्या स्वरुपात आला होता हल्लेखोर
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सना युसूफची तिच्याच घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. ही घटना इस्लामाबादमध्ये घडली असून हत्येनंतर हल्लेखोराने पळ काढला आहे. 17 वर्षीय सना युसूफ ही चित्राल येथील रहिवासी होती. ती सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय होती, सना खासकरून चित्रालची संस्कृती, महिलांचे अधिकार आणि शिक्षणाशी निगडित जागरुकता आणि विनोदी रील्ससाठी ओळखली जात होती.सनाच्या जन्मदिनी एक इसम नातेवाईकाच्या स्वरुपात तिच्या घरी दाखल झाला होता. आरोपीने प्रथम सनाशी घराबाहेर संभाषण केले आणि मग घरात येत 2 गोळ्या झाडल्या. यामुळे सनाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.सनाची आई फरजाना युसूफ यांनी याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे. अज्ञात इसम घरात दाखल झाला होता, त्याने माझ्या मुलीवर दोन गोळ्या झाडल्या, मारेकरी समोर आला तर त्याला ओळखू शकते असे फरजाना यांनी पोलिसांना सांगितले आहे.टिकटॉकवर सनाचे 7.25 लाख तर इन्स्टाग्रामवर सुमारे 5 लाख फॉलोअर्स आहेत. तिच्या लुकमध्ये तिची तुलना प्रसिद्ध अभिनेत्री हानिया आमिरशी केली जात होती. तर सना सध्या वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तयारी करत होती.
ऑनर किलिंगचा संशय
पोलिसांनी एफआयआर नोंदवत तपास सुरू केला आहे. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या संशयिताची ओळख पटविणे आणि त्याला अटक करण्यासाठी अनेक पथके स्थापन करण्यात आली आहेत. संभाव्य कारणांमध्ये ऑनर किलिंग देखील सामील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सनाच्या हत्येचे वृत्त समोर येताच परिसरात खळबळ उडाली. पाकिस्तानात सोशल मीडिया युजर्सनी दु:ख व्यक्त केले आहे. तर पाकिस्तानातीला महिलांच्या सुरक्षेवरून मोठी चिंता व्यक्त केली आहे. सनाला न्याय मिळवून देण्याची मागणीही केली जात आहे. तर अनेक कट्टरवादी लोक सनाच्या हत्येवर आनंदही व्यक्त करत आहेत.