17 टीटीपी दहशतवादी पाकिस्तानमध्ये ठार
खैबर पख्तूनख्वा प्रांतात संयुक्त कारवाई
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कराक जिह्यात सुरक्षा दलांनी बंदी घातलेली दहशतवादी संघटना ‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानशी (टीटीपी) संबंधित 17 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. फ्रंटियर कॉर्प्स (एफसी) आणि पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या मोहिमेत ही कारवाई करण्यात आली. गुप्तचर विभागाकडून टीटीपी आणि नझीर ग्रुपचे दहशतवादी परिसरात उपस्थित असल्याची विश्वासार्ह माहिती मिळाल्यावर कराक जिह्यात ही कारवाई सुरू करण्यात आली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या जवळ जाताच त्यांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरात 17 दहशतवादी मारले गेले. त्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात शस्त्रs आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. या संघर्षात तीन सुरक्षा कर्मचारीही जखमी झाले आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना सुरक्षा दलांवर हल्ले, खंडणीसाठी अपहरण आणि इतर गंभीर दहशतवादी कारवायांचे अनेक आरोप होते. सुरक्षा दलांच्या कारवाईनंतर काराक जिल्हा प्रशासनाने आसपासच्या गावांमध्ये संचारबंदी लागू केली. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शोधमोहीम सुरू केली. काही दहशतवादी पळून गेले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.