रिलायन्स इंडस्ट्रिजला 17 हजार 265 कोटी रुपयांचा नफा
मुंबई :
तेलसह, रिटेल व दूरसंचारसह इतर क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा तिमाही निकाल नुकताच जाहीर झाला आहे. चालू आर्थिक वर्षातील तिमाहीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचा निव्वळ नफा 9.3 टक्के इतका वाढला आहे. सदरच्या तिमाहीत कंपनीचा ऊर्जा व्यवसाय काहीसा नरमाईमध्ये राहिला असून रिटेल आणि दूरसंचार व्यवसायाने रिलायन्सच्या नफ्यामध्ये वाढ करण्यामध्ये हातभार लावला होता. आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने 17,265 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. याच कालावधीमध्ये तीन टक्के वाढीसह 2.25 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न कंपनीने प्राप्त केले आहे. आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीपेक्षा निव्वळ नफा 0.7 टक्के आणि उत्पन्न 2.9 टक्के घटले आहे. रिटेल क्षेत्राने तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीला 74 हजार 373 कोटी रुपये मिळवून दिले आहेत. रिलायन्सच्या रिटेल व्यवसायाने उद्योगाला चांगले योगदान देण्यात बाजी मारली आहे. मागच्या वर्षाच्या समान अवधीच्या तुलनेमध्ये 23 टक्के अधिक उत्पन्न मिळवून दिले आहे. दुसरीकडे कंपनीच्या दूरसंचार व्यवसायाने 27 हजार 697 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.
रियालन्स जिओने जोडले 9 कोटीहून अधिक ग्राहक
रिलायन्स जिओने 9 कोटीहून अधिक 5जी सेवा ग्राहक जोडून नवा इतिहास रचला आहे. सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओने 5जी नेटवर्क अंतर्गत वरील कामगिरी प्राप्त केली आहे. जिओ नेटवर्कच्या अंतर्गत ग्राहकांनी 38 अब्ज जीबी इतका डाटा वापरला असल्याचेही दिसून आले आहे. याअंतर्गत 9 अब्ज जीबी इतक्या डाटाचा वापर केला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे चेअरमन आकाश अंबानी यांनी सांगितले की जगामध्ये जिओने सर्वाधिक वेगवान 5 जी सेवा पुरवली असल्याचा आपल्याला अत्यानंद होत आहे. आता ही सेवा संपूर्ण भारतभर उपलब्ध केली आहे. जिओ एअर फाइबर अंतर्गत टायर तीन आणि टायर्स चार शहरातील गाव-खेड्यांपर्यंत सेवा मजबूत केली जाण्याला कंपनीने प्राधान्य दिले आहे.