पाकिस्तानच्या हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंसह 17 ठार
हवाई हल्ला : शस्त्रसंधी संपल्यानंतर पुन्हा संघर्ष
वृत्तसंस्था/ काबूल
पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंसोबतच अन्य 14 नागरिक ठार झाले आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) याची पुष्टी करत तीन क्लब क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेमुळे नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या तिरंगी टी-20 मालिकेतून माघार घेण्याची घोषणा ‘एसीबी’ने केली आहे. मृतांच्या सन्मानार्थ हे पाऊल उचलण्यात आले आहे. या मालिकेत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेचे संघ स्पर्धेत सहभागी होणार होते.
पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीत पेलेल्या ताज्या हल्ल्यात एकूण 17 जण ठार झाले असून अन्य 16 जण जखमी झाले आहेत. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील 48 तासांचा युद्धविराम शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता संपला. तथापि, काही तासांनंतरच पाकिस्तानने पक्तिका प्रांतात हवाई हल्ले सुरू केले. अफगाणिस्तानातील माध्यम टोलो न्यूजनुसार, दोन्ही देशांच्या सीमेवरील डुरंड रेषेजवळ असलेल्या उरगुन आणि बर्मल जिह्यातील अनेक घरांना लक्ष्य करून हवाई हल्ले करण्यात आले.
क्रिकेट सामन्यावरून परतणाऱ्या खेळाडूंवर हल्ला
एसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एक निवेदन जारी करत क्रिकेटपटूंवरील हल्ल्याला दुजोरा दिला आहे. हा हल्ला पक्तिका प्रांताची राजधानी शरण येथे एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यावरून परतणाऱ्या खेळाडूंना लक्ष्य करून करण्यात आला. हवाई हल्ल्यात कबीर, सिबगतुल्ला आणि हारून या तीन खेळाडूंना प्राण गमवावे लागले. ‘एसीबी’ने हल्ल्याबद्दल अधिक माहिती दिली नाही. हल्ल्याच्या दिवशी कबीरला एका गावातील स्पर्धेत सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले होते. सध्या ट्रॉफी हातात धरलेला त्याचा फोटो व्हायरल होत आहे.
टी-20 मालिकेतून अफगाणची माघार
हल्ल्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या त्रिकोणीय टी-20 मालिकेतून माघार घेतली. संघ 17 आणि 23 नोव्हेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध सामने खेळणार होता. पाकिस्तानच्या भूमीवर अफगाणिस्तान खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. तथापि, अफगाणिस्तानने यापूर्वी 2023 च्या आशिया कप आणि यावर्षीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानमध्ये सामने खेळले होते, परंतु यजमान संघाचा सामना केला नव्हता.