कळंगुटमधील 17 क्लबना तीन दिवसांची मुदत : लोबो
म्हापसा : कळंगुटमध्ये 17 क्लब आहेत. त्यांच्या आतमध्ये रेस्टॉरंटस्ही आहेत. त्यांच्याकडे सुरक्षा यंत्रणा कोणत्याच नाही, असे आढळून आले आहे. हे क्लब बंद करावे लागेल. त्यांनी नियमांप्रमाणे सर्व व्यवस्था पूर्ण केल्यावर त्यांना पंचायतीत अहवाल पाठवावा लागेल. त्यानंतरच नूतनीकरण पंचायत करील. तोपर्यंत या सर्व क्लबांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी कळंगुट पंचायतीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा उपस्थित होते.
सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले की, आम्ही कुणालाही नाईट क्लब परवाना दिलेला नाही. आम्ही रेस्टॉरंटसाठी परवाना देतो मात्र ते नंतर आतमध्ये क्लब करतात. यापुढे सर्व खात्यांचे ना हरकत दाखले दिल्यावरच आम्ही परवाना देणार आहोत. येत्या तीन दिवसात या 17 क्लबना याबाबत आम्ही नोटीस बजावणार आहोत. त्यांनी पालन केले नाही तर आम्ही त्यांचे क्लब सिलबंद करणार आहे, असेही सिक्वेरा म्हणाले. आमच्याकडूनही काही चुका झाल्या आहेत, त्रुटी राहिल्या आहेत. काही ना हरकत दाखले आम्ही यापूर्वी घेतले नाही, अशी कबुलीही सिक्वेरा यांनी दिली.