For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकअदालतीत 16,665 खटले निकाली

06:58 AM Jul 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
लोकअदालतीत 16 665 खटले निकाली
Advertisement

23 जोडप्यांना आणले एकत्र : 70 कोटीहून अधिक भरपाई जाहीर : 24 कौटुंबिक खटले निकाली

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणातर्फे शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 20 हजारहून अधिक विविध खटले निकाली काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यावेळी 16 हजार 665 खटले निकालात काढण्यात आले असून 70 कोटी 20 लाख 75 हजार 159 रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे 23 जोडप्यांमध्ये समझोता करून त्यांना एकत्र आणण्यात आले असून एक प्रकरणी दुरावलेल्या मुलीला पुन्हा वडिलांकडे  सुपूर्द करण्यात आले.

Advertisement

गेल्या अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रलंबित खटले वादी व प्रतिवादींच्या समझोत्यातून निकालात काढण्यात आले. गेल्यावर्षी 15 हजारहून अधिक खटले निकालात काढण्यात आले होते. यंदा 25 हजार 706 प्रकरणे लोक अदालतीत दाखल झाली असली तरी त्यापैकी 16 हजार 665 निकालात काढण्यात आली. शेतजमिनीचे वाद, कर्ज प्रकरणे, गुन्हेगारी, अपघात यासह इतर प्रकरणांचा यामध्ये समावेश होता. प्रलंबित खटल्यांबाबत दोन्ही बाजूंच्या लोकांना एकत्र बसवून तोडगा काढण्यात आला.

लोक अदालतीमध्ये 25 हजार 706 प्रकरणे घेण्यात आली होती. यापैकी 16 हजार 665 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 23 जोडप्यांना पुन्हा संसार सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तर ताटातूट झालेल्या एका मुलीला पुन्हा वडिलाच्या छत्रछायेखाली आणण्यात आले. असे एकूण 24 कौटुंबिक खटले निकाली काढण्यात आले. तसेच विविध प्रकरणांमुळे त्रासलेल्या नागरिकांना लोक अदालतीच्या माध्यमातून त्यांना कायद्याच्या कचाट्यातून बाहेर काढण्यात आले.

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये प्रलंबित खटले तातडीने निकाली काढले जातात.  यामध्ये आर्थिक खर्च येत नसून खटल्यांमुळे अनेक संकटांचा सामना करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळतो. लोकअदालतीचा वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या व यामुळे ‘तारीख पे तारीख’ला न्यायालयाच्या पायऱ्या झिजवणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला. जी प्रकरणे जटिल होती ती खटले नेहमीप्रमाणे न्यायालयात चालणार असून त्यांनाही लवकरात लवकर दिलासा देण्याचा प्रयत्न न्यालयाकडून होणार आहे. या लोक अदालतीच्या माध्यमातून हजारो नागरिकांना कोर्ट कचेरीतून बाहेर काढण्यात आले.

Advertisement
Tags :

.