जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून 160 जणांना दोन कोटींचा गंडा
आरजेपॅपिलॉन संचालकांसह 22 एजंटांवर गुन्हा नोंद
पणजी : जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून राज्यातील 160 गुंतवणूकदारांना सुमारे 2 कोटी 37 लाख ऊपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. याबाबत आर्थिक गुन्हा विरोधी विभागाने (इओसी) आरजेपॅपिलॉन लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच अन्य संचालक आणि 22 एजंटांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 406, 409, 420, आरडब्ल्यू 120 बी, 3 व 5 गोवा गुंतवणूकदारांचे हितरक्षण कायदा व इतर कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. राज्यातील गुंतवणूकदारांच्यावतीने इओसीचे निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणूक प्रकरणात आरजेपॅपिलॉन लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक वृषाली ताम्हाणे, संचालक पल्लवी रंगले, गौतम जाधव, मनीषा जोशी, रमेश जोशी, अनुप अधिकारी याच्यासह 22 एजंटांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
1 एप्रिल 2021 ते 30 ऑक्टोबर 2024 दरम्यान आरजेपॅपिलॉन कंपनीने गोव्यात विविध ठिकाणी शाखा खुल्या करून गोव्यातील गुंतवणूकदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवले होते. व्यवस्थापकीय संचालक वृषाली ताम्हाणे, संचालक पल्लवी रंगले, गौतम जाधव यांनी राज्यात एजंटांची नियुक्ती केली होती. त्यांच्यामार्फत कंपनीने गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास लावले. या योजने अंतर्गत 160 गुंतवणूकदारांनी सुमारे 2 कोटी 37 लाख 96 हजार 622 ऊपयांची गुंतवणूक केली आहे. आरजेपॅपिलॉन कंपनीने गोव्यातील सर्व शाखा बंद करून पळ काढला आहे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी इओसी विभागाकडे धाव घेतली. याची दखल घेऊन इओसीचे पोलिस निरीक्षक राझाशद शेख यांनी आरजेपॅपिलॉन फायनान्स लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक, अन्य संचालक यांच्यासह 22 एजंटांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.