अमेरिकेत मिल्टन चक्रीवादळाचे 16 बळी
पूरामुळे 120 घरांचे नुकसान : 30 लाख घरांमधील वीजपुरवठा ठप्प
वृत्तसंस्था/ टॅम्पा
अमेरिकेत मिल्टन चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. फ्लोरिडा प्रांतात आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 लाख घरे आणि ऑफिसेसचा वीजपुरवठा ठप्प झाला आहे. तर चक्रीवादळामुळे 120 घरांचे नुकसान झाले आहे.
सेंट्रल फ्लोरिडात मिल्टनमुळे 10-15 इंचापर्यंतचा पाऊस पडला असून यामुळे तेथे पूर आला आहे. अमेरिकेच्या तटरक्षक दलाने मेक्सिकोच्या उपसागरात अडकून पडलेल्या एका व्यक्तीला वाचविले आहे. लाइफ जॅकेटच्या मदतीने हा इसम पाण्यात स्वत:चा जीव वाचविण्याचा प्रयत्न करत होता.
मिल्टन हे फ्लोरिडाला धडकणारे चालू वर्षातील तिसरे चक्रीवादळ आहे. मिल्टन गुरुवारी फ्लोरिडाच्या सिएस्टामध्ये सागर किनाऱ्यावर धडकले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने इशारा जारी केला होता. चक्रीवादळाची तीव्रता ओसरल्यावर टॅम्पा आंतरराष्ट्रीय विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी केली जात आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीदरम्यान लोकांच्या मदतीसाठी फ्लोरिडा नॅशनल गार्डच्या 6500 जवानांना तैनात करण्यात आल्याची माहिती पेंटागॉनकडून देण्यात आली.
याचबरोबर 19 प्रांतातील 3 हजार गार्ड्सनाही तैनात करण्यात आले आहे. 26 हेलिकॉप्टर्स आणि 500 हून अधिक हाय-वॉटर व्हेईकल्सचीही मदत घेण्यात आली आहे. अमेरिकेत तीन महिन्यात जितका पाऊस पडतो, तितका पाऊस केवळ तीन तासांमध्ये पडला आहे. 20 लाखाहून अधिक लोक पूरामुळे प्रभावित झाले आहेत.
हेलन चक्रीवादळामुळे 225 बळी
फ्लोरिडात मिल्टनपूर्वी हेलेन चक्रीवादळ धडकले होते, ज्यात 12 प्रांतांमधील 225 जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. हेलेन चक्रीवादळामुळे एक कोटी 20 लाख लोक प्रभावित झाले होते. तर 1 हजार विमानो•ाणे रद्द करावी लागली होती. अमेरिकेच्या फ्लोरिडा, जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिना, दक्षिण कॅरोलिना, वर्जीनिया आणि अल्बामा या प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.