Satara Crime : 'रयत'मध्ये नोकरीच्या आमिषाने 16 जणांची तब्बल 40 लाखांची फसवणूक
साताऱ्यात नोकरीच्या आमिषाने अनेकांची फसवणूक
सातारा : रयत शिक्षण संस्थेत शिपाई, क्लार्क, शिक्षक या पदावर नोकरीस लावतो, असे सांगून १५ ते १६ जणांची चाळीस लाखांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी एका पक्षाच्या पदाधिकारी पत्तीस मंगळवारी रात्री अटक करण्यात आली आहे. सदाशिव कल्लाप्पा नाईक (वय ४०, सध्या रा. तासगाव, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीस लावले जाईल, असे सांगून सदाशिव नाईक यांनी अनेकांना गळास लावले. यामध्ये रामोशी समाजातील लोक बहुतांश प्रमाणात अडकले आहेत. नोकरीस लावताना विशेषतः रामोशी समाजातील अनेकांना भंडारा उचलून विश्वास दिला. नोकरीच्या आमिषाने लाखो रुपये उकळल्यानंतर त्यांना विश्वास देण्यासाठी सुरुवातीला बनावट नियुक्तीपत्रेही दिली.
हे सर्व प्रताप उघडकीस आल्यानंतर त्याच्याकडे दिलेले पैसे पुन्हा देण्याचा तगादा अनेकांनी सदाशिव नाईक यांच्याकडे लावला. मात्र, पैसे आज, उद्या देतो, असे सांगून वेळ मारुन नेऊ लागला. अखेरीस काहींनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याला मंगळवारी रात्री अटक केली.
याबाबत अजूनही अनेकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता विचारात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही पाच ते सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून गायबच असल्याने कोल्हापूर येथून वॉरंट काढण्यात आले. त्यामुळे तो सातारा पोलिसांना सापडला. सुरुवातीला कोडोली सातारा येथे भाड्याच्या घरात राहायला होता. आज तो पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विकास राठोड करत आहेत.
पोलिसांशी संपर्क साधावा
रयत शिक्षण संस्थेत शिपाई, क्लार्क, शिक्षक या पदावर नोकरीस लावण्याच्या बहाण्याने सदाशिव नाईक या व्यक्तीने अनेकांकडून लाखो रुपये घेतल्याची बाब आता उघडकीस आली आहे. ही साखळी अजून वाढण्याचीच शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरु आहेच. पण अजूनही सातारा जिल्ह्यातील ज्यांची याबाबत फसवणूक झाली आहे, त्यांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
-पो. नि. राजेंद्र मस्के सातारा शहर