16 दिवस, 32 खेळ, 10 हजार खेळाडू
पॅरिस ऑलिम्पिकसाठी चार नवे खेळ : भारताची तिरंदाजी मोहिम गुरुवारपासून
वृत्तसंस्था/ पॅरिस
जगातील सर्वात मोठा कुंभमेळा असणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिस व आसपासच्या 16 शहरात या स्पर्धेचे थाटात आयोजन करण्यात येणार आहे. 26 जुलै रोजी सीन नदीच्या काठी भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. याचबरोबर काही देशांमधील खेळाडू हे पॅरिसमध्ये पोहोचले सुद्धा आहेत. विशेष म्हणजे, 17 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 32 क्रीडा प्रकारासाठी एकूण 10500 खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये भारताचे 117 खेळाडू होतील.
पॅरिस ऑलिम्पिकमधील काही खेळांची सुरुवात 24 जुलैपासूनच होणार आहे. यानंतर 26 जुलैला भव्यदिव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा 26 जुलै रोजी सीन नदीवरील जार्डिन्स डु ट्रोकाडेरो येथे होणार आहे. यंदाच्या ऑलिम्पकमध्ये चार नव्या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यंदा 32 खेळांमध्ये 10500 खेळाडू खेळणार आहेत. त्याचबरोबर काही खेळांचा या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच समावेश करण्यात आला आहे. 32 खेळांच्या एकूण 329 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
यंदाच्या स्पर्धेत चार नवीन खेळ
टोकियो 2020 च्या तुलनेत यावेळी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चार नवीन खेळांनाही स्थान देण्यात आले आहे. ब्रेक डान्सिंग, स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लाइंबिंग आणि सर्फिंगचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या चारही प्रकारात एकही भारतीय खेळाडू नाही आहे.
उद्घाटन सोहळ्याची भव्यदिव्यता दिसणार 6 किमी परिसरात
पॅरिस ऑलिम्पिकचा यंदाचा भव्यदिव्य उद्घाटन सोहळा हा एखाद्या स्टेडियमवर न होता सीन नदी आणि ट्रोकाडेरो येथे आयोजित करण्यात आली आहे. याचबरोबर या उद्घाटन सोहळा 6 किलोमीटरच्या परिसरामध्ये होणार आहे. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणात लोक पाहायला येणार आहेत. या सर्व गोष्टींचे बारकाईने आयोजन करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारताची मोहिम गुरुवारपासून
ऑलिम्पक स्पर्धेचे उद्घाटन जरी 26 जुलै रोजी होणार असले तरी काही स्पर्धा दोन दिवस आधी सुरु होणार आहेत. यामध्ये भारताची ऑलिम्पक मोहिम गुरुवारपासून सुरु होणार आहे. तिरंदाजीमध्ये गुरुवारी सायंकाळच्या सत्रात पुरुष व महिलांची वैयक्तिक राऊंड सुरु होणार आहेत.
टेनिसमध्ये सर्वात जास्त वयस्कर खेळाडू आजमवणार नशीब
सर्वाधिक वयाचा भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा आता ऑलिम्पिकमध्ये आपले नशीब आजमावणार आहे. 2002 पासून भारताच्या डेव्हिस चषक संघाचा सदस्य असलेल्या रोहन बोपण्णाने दोन ग्रँड स्लॅम जेतेपद अन् त्याच्या कारकिर्दीत 6 एटीपी मास्टर्स 1000 किताबही जिंकले आहेत. या अनुभवी टेनिसपटूने 2012 आणि 2016 च्या ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यंदा तो पुरुष दुहेरीत एस बालाजी सोबत खेळणार आहे. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या बोपण्णाकडून आता शानदार कामगिरीची अपेक्षा असेल.