जिल्ह्यात ‘मध्यस्थी’ अंतर्गत 156 खटले निकाली
न्यायाधीश संदीप पाटील यांची माहिती : राज्यभरात 5575 प्रकरणांचा निकाल : निकाली खटल्यानंतर पुन्हा खटला दाखल नाही
बेळगाव : सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण यांच्यावतीने ‘राष्ट्रासाठी 90 दिवसांची कृती’ अंतर्गत विशेष मध्यस्थी मोहीम राबविण्यात आली होती. याअंतर्गत जिल्ह्यातील 4655 खटल्यांपैकी 156 खटले निकाली काढण्यात आली असून वादी-प्रतिवादींमध्ये वकिलांच्या मध्यस्थीने खटल्यांचा निकाल देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व न्यायाधीश संदीप पाटील यांनी दिली. जिल्हा न्यायालय आवारातील नूतन न्यायालय संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पाटील म्हणाले, 1 जुलै ते 6 आक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रासाठी 90 दिवसांची कृती’ अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली. उच्च न्यायालय व जिल्हा सत्र न्यायालय अंतर्गत सुमारे 13 लाख 86 हजार 837 खटले प्रलंबित होती. 76 हजार 230 प्रकरणे निवडून मध्यस्थी केंद्राकडे पाठविण्यात आली होती. यापैकी 47 हजार 80 प्रकरणे मध्यस्थी मोहिमेसाठी घेण्यात आली. राज्यभरात 5 हजार 575 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 26 हजार 144 प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. तसेच उर्वरित 15 हजार 361 खटले अद्याप मध्यस्थीतून निकाली निघालेली नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, या मध्यस्थी मोहिमेमध्ये घटस्फोट वगळता वैवाहिक वाद, अपघात, घरगुती हिंसाचार, चेकबाऊन्स, व्यावसायिक वाद, कर्जवसुली, मालमत्ता आदी प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तसेच विशेष मोहीम अंतर्गत 206 जुनी प्रकरणेही निकाली काढली आहेत. यामध्ये 5 वर्षे 177, 10 वर्षे 23 तर 15 वर्षांपासून प्रलंबित असणारे 6 खटले निकाली काढण्यात आली आहेत. तसेच 159 प्रकरणांमध्ये मध्यस्थी करून पुन्हा दाम्पत्यांना एकत्र आणण्यात आले आहे. त्याचबरोबर 163 प्रकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांनाही या मोहिमेचा लाभ झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
या मध्यस्थी मोहीम अंतर्गत बेळगाव जिल्ह्यातील 4655 खटले घेण्यात आले होते. यापैकी 995 खटल्यांची निवड करण्यात आली होती. यापैकी 156 खटले निकाली काढण्यात आले आहे. बेळगाव 6, अथणी 7, बैलहोंगल 13, चिकोडी 35, गोकाक 14, हुक्केरी 30, खानापूर 2, निपाणी 4, रायबाग 4, रामदुर्ग 3, संकेश्वर 2, सौंदत्ती 4 व कित्तूर न्यायालयाच्या माध्यमातून 32 प्रलंबित खटले निकाली काढण्यात आली आहेत. निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांना पुन्हा खटला दाखल करण्यात येणार नाही. या उद्देशानेच ही मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेचा अनेक प्रकरणांमुळे अनेक वर्षांपासून निकालाची वाट पाहत असणाऱ्यांना लाभ झाला असून अशाप्रकारची मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
13 डिसेंबर रोजी लोकअदालत
येत्या 13 डिसेंबर रोजी बेळगावमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही चौथी लोकअदालत असणार असून प्रलंबित खटले निकाली काढण्यात येणार आहे. विविध न्यायालयांमध्ये एकाचवेळी वादी-प्रतिवादींना एकत्र बोलावून खटले निकाली काढली जाणार आहे. गेल्या लोकअदालतीमध्ये 16 हजार 665 खटले काढण्यात आले होते. यंदा यापेक्षाही अधिक खटले निकाली काढण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असे संदीप पाटील यांनी सांगितले.