भारतीय हवामानशास्त्र विभागाचा 150 वा स्थापना दिवस साजरा
रत्नागिरी प्रतिनिधी
शहरातील साळवी स्टॉप येथील भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पवन सूचक वेधशाळा येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाचा 150 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. सोमवर दि 15 जानेवारी 2024 रोजी यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी सकाळी तटरक्षकच्या विमानतळातील हवामान विभागातील तटरक्षक अधिकाऱयांनी पवन सूचक वेधशाळा केंद्राला भेट दिली. यावेळी तटरक्षक अधिकाऱयांना केंद्राचे प्रभारी अधिकारी राजेश सोनार यांनी केंद्रातील पर्जन्ये मोजणारी परिमाणे, विविध उपकरणे शिवाय किमान कमाल तापमान मोजणाऱया तापमापी, दामिनी ऍप यासंदर्भात विस्तृत माहिती दिली. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठ उपकेंद्रातील एम एस सी पर्यावरणशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी देखील या केंद्राला भेट देत केंद्राच्या माध्यमातून चालणारे कामकाज जवळून जाणून घेतले.
भारतीय हवामान विभागाचे कार्य अत्यंत विस्तारलेले आहे. भारतीय उपखंडात होणारी वातावरणीय स्थित्यंतरे, वादळे, पाऊस, थंडी, उन्हाळा याशिवाय हवामानसंदर्भात अत्यंत महत्त्वाचे संशोधन विविध शास्त्राrय़ उपकरणांच्या माध्यमातून केले जात असते. ही माहिती नागरिकांसह शेतकऱयांसाठी खूप महत्त्वाची असते.
भारतीय हवामान विभागाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने पवन सूचक वेधशाळा केंद्रात काम करून निवृत्त झालेल्या माजी अधिकारी व कार्यालयीन सदस्यांना बोलावण्यात आलेले होते. यावेळी या माजी अधिकारी व सदस्यांचा त्यांनी बजावलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भारतीय तटरक्षक दलाचे हितेश दमन व अधिकारी उपस्थित होते. तसेच मुंबई विद्यापीठ उपकेंद्राचे प्रा. पांडुरंग पाटील आणि विद्यार्थी उपस्थित होते. त्याशिवाय मुंबईतील संजय राणे (मौसम वैज्ञानिक श्रेणी बी), याशिवाय पवन सूचक वेधशाळा केंद्र रत्नागिरीचे प्रभारी अधिकारी राजेश सोनार (मौसम वैज्ञानिक श्रेणी ए) यांची उपस्थिती होती. याच केंद्राचे माजी कार्यालय प्रमुख आनंद पाटणकर, अनिस गिनीवाले तसेच कार्यालयीन सदस्यांपैकी प्रभाकर वेंगुर्लेकर आणि रावसाहेब माने उपस्थित होते.