150 वर्षे जुनी ट्राम सेवा बंद करण्याची तयारी
पश्चिम बंगाल सरकारकडून निर्णय : सीयूटीए करणार विरोध
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगाल सरकारने कोलकात्यातील 150 वर्षे जुनी परिवहन सेवा ट्राम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकार मैदानपासून एस्प्लेनेडपर्यंत एक वारसा मार्ग वगळता अन्य ट्राम लवकरच बंद करण्याच्या तयारीत असल्याचे परिवहन मंत्री स्नेहासिस चक्रवर्ती यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे कलकत्ता ट्राम वापरकर्ता संघाने (सीयूटीए) या निर्णयाला विरोध करण्याची घोषणा केली आहे.
पूर्ण देशात केवळ कोलकाता या शहरातच ट्राम धावते. मंदगतीमुळे धावणारी ट्राम अत्यंत गर्दीच्या काळात रस्त्यांवर कोंडीची स्थिती निर्माण करते. वर्तमान काळात ही सेवा चालविली जाऊ शकत नाही, कारण रस्त्यांवर वाहने आणि लोकांची गर्दी वाढत आहे. कोलकात्यात रस्त्यांचा हिस्सा केवळ 6 टक्के आहे. अशास्थितीत संध्याकाळी ट्राम आणि वाहने एकाचवेळी रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी भीषण केंडी निर्माण होत असल्याचे परिवहन मंत्र्यांनी म्हटले आहे.
1873 मध्ये अश्वाद्वारे खेचण्यात येणाऱ्या गाडीच्या स्वरुपात सुरुवात झाल्यावर ट्राम कोलकात्याच्या वारशाचा एक हिस्सा आहे. ट्रामने परिवहनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ट्राम चालविण्याचा मुद्दा आता कलकत्ता उच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे. राज्य सरकार पुढील सुनावणीत यासंबंधी भूमिका मांडणार असल्याचे चक्रवर्ती यांनी सांगितले आहे.
महानगरात सर्वात कमी रस्त्यांचे प्रमाण असूनही कोलकाता पोलिसांनी गर्दीच्या काळातही वाहतूक सुरळीत ठेवली आहे. वाहतूक कोंडीमुळे लोकांना ऑफिसला जाण्यास विलंब होऊ नये म्हणून आम्ही ट्रामला रस्त्यांवरून हटविण्यासोबत काही कठोर पावले उचलणार आहोत. परंतु हेरिटेज ट्राम मैदान आणि एस्पेलेनेडदरम्यान धावणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या निर्णयाला कलकत्ता ट्राम वापरकर्ता संघाने (सीयूटीए) विरोध दर्शविला आहे. याप्रकरणी आम्ही शहरात 5 ट्राम डेपोंसमोर निदर्शने करणार आहोत असे सीयूटीएने म्हटले आहे. आम्ही ट्राम बंद होऊ देणार नाही. राज्य सरकार वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी गंभीर असेल तर रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात यावीत आणि रस्त्यांचे रुंदीकरण केले जावे. ट्राम वाचविण्यासाठी चालू आठवड्यात आम्ही आंदोलन सुरू करू असे पर्यावरण कार्यकर्ते सोमेंद्र मोहन दास यांनी नमूद केले आहे.
डेपोंमध्ये अनेक वर्षांपासून वापराविना पडलेल्या ट्राम कार्सची दुरुस्ती आणि नियमित देखभाल सरकारने केली तर ट्रामसेवा सुरळीतपणे चालविता येऊ शकते असे सीयूटीएचे सदस्य कौशिक दास यांनी म्हटले आहे. सीयूटीएने कोलकाता ट्राम वाचविण्यासाठी हॅशटॅग अभियान देखील सुरू केले आहे.