महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

150 लोकांना 130 कोंटीचा गंडा

12:34 PM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयडीलीक कंपनीच्या संचालकांविराधात गुन्हा नोंद : चारजणांचे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, मायरन गायब

Advertisement

पणजी : ज्यादा व्याज देण्याचे अमिष दाखवून 150 लोकांची सुमारे 130 कोटी ऊपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात आर्थिक गुन्हा विरोधी विभागाने (ईओसे) आयडीलीक गोवन गेटवेज कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती गुन्हा अन्वेषण विभागाचे संचालक राहूल गुप्ता यांनी दिली आहे. याच प्रकरणात यापूर्वी मायरन रॉड्रिगीस आणि दीपाली परब यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

काल रविवारी पोलिस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहूल गुप्ता बोलत होते. आयडीलीक कंपनीचे संचालक संशयित नोलन आंताव, विजय जॉयल, नवनिक मारियो परेरा आणि सुशांत घोडगे यांनी पणजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला असून अटी घातल्या आहेत. त्यांना 5 दिवस सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत इओसीच्या कार्यालयात हजर रहाण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू आहे. आरोपी मायरन आणि त्याच्या साथीदारांना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

इव्हॉन आल्मेदा यांची तक्रार

संशयित मायरन रॉड्रिगीज आणि त्याची पत्नी दीपाली परब विरोधात 11 ऑगस्ट 2023 रोजी इव्हॉन सुरेश जोकिम आल्मेदा (नावेली, सालसेत-गोवा) यांनी तक्रार दाखल केली होती. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट फायदा होईल असे आमिष दाखविल्यानंतर तक्रारदाराने 36 लाख 54 हजार 336 ऊपयांची गुंतवणूक केली हेती. मात्र त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणाचा तपास करीत असताना संशयितांना अनेकांना कोट्यावधी ऊपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. त्यानंतर 30 ऑगस्ट 2023 रोजी संशयितांच्या विरोधात आणखी तक्रारी आल्या होत्या. त्यात 20 कोटी 83 लाख 90 हजार 336 ऊपयांची फसवणूक झाल्याचे म्हटले होते.

अधिकतर गुंतवणूकदार सालसेतचे

संशयित मायरन रॉड्रिगीज आणि दीपाली परब यांच्या विऊद्ध गुंतवणूकदारांकडून  एकूण 38 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणात 50 हून अधिक गुंतवणूकदार आहेत ज्यांची 100 कोटी ऊपयांची फसवणूक झाली आहे. फसवणूक ही मुख्यत: सालसेत तालुक्यातील लोकांशी झाली असल्याचे दिसून येत आहे, असे गुप्ता यांनी सांगितले आहे.

शेअर ब्रोकर, आर्थिक तज्ञ 

तक्रारदार 2011 पासून गुंतवणूक करत असून त्यांना त्यांचे पैसे परत मिळाले नाहीत. संशयित मायरनने गुंतवणूकदारांना स्वत: शेअर ब्रोकर आणि दीपाली ही आर्थिक तज्ञ म्हणून ओळख दिली आणि अनेकांची फसवणूक केली.

मायरनला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न  

संशयित दीपाली परब हिला नोटिस बजावली असून तिला इओसी येथे चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मायरन फरार आहे आणि कायद्याची प्रक्रिया टाळत आहे. 24 जुलै 2023 रोजी तो भारतातून दुबईमार्गे लंडनला पळून गेल्याचे गुप्तचर माहितीवरून कळाले आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे एलओसी आणि इंटरपोलद्वारे ब्लू नोटिस संशयित मायरन विऊद्ध जारी केली आहे. त्याला गोव्यात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. रेड कॉर्नर नोटिस प्रक्रियेत आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

मायरन, सुनीता, दीपालीची कोट्यावधींची मालमत्ता

मायरनने 2021 मध्ये त्याची पहिली पत्नी सुनीता रॉड्रिग्स हिला घटस्फोट दिला होता. त्यानंतर त्याने दीपाली परबशी लग्न केले. या दोघांची एकूण 6 लाख 8 हजार 663  ऊपयांची  मुदत ठेव असलेली बँक खाती गोठवलेली आहेत. 35 लाख 25 हजार रपये आणि दोन बँक लॉकर देखील गोठली आहेत. तसेच मायरन, सुनीता आणि दीपाली यांच्या मालकीच्या एकूण 08 मालमत्ता ओळखल्या आहेत. उपनिबंधकांना पत्र पाठवून त्यांची मालमत्ता ब्लॉक केली आहे. एकूण 07 फ्लॅट आणि 01 व्हिला मिळून एकूण साडेतीन कोटीची मालमत्ता आहे, असे गुप्ता म्हणाले.

‘फातोर्डा गोवा टू लंडन’ कनेक्शन,मुख्यमंत्रीसावंत यांनी दिली माहिती

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून गोव्यातील सुमारे 150 लोकांना 130 कोटींचा गंडा घालण्याचा गोव्यातील इतिहासातील सर्वांत मोठा आर्थिक घोटाळा असून या घोटाळ्याचे कनेक्शन ‘फातोर्डा गोवा टू लंडन’ असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल रविवारी दिली. मडगाव रवींद्र भवनात एका कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याकडून आर्थिक घोटाळ्याची माहिती जाणून घेतली असता, मुख्यमंत्री म्हणाले की, या आर्थिक घोटाळ्यात गुंतलेल्या सर्वांवर कठोर कारवाई होणार आहे. कुणाचाही सुटका होणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

लंडनपर्यंत जाऊन तपास करणार

या घोटाळ्याची आर्थिक व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्याचे कनेक्शन फातोर्डा गोवा टू लंडनपर्यंत आहे. पोलिसांचा आर्थिक गुन्हे विभाग लंडन पर्यंत जाऊन या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. या आर्थिक घोटाळ्यात गुंतलेल्यापैकी काहीजण हे राजकीय पक्षांकडे संबंधित आहेत. त्यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल केला असता मुख्यमंत्री म्हणाले की, गरीब लोकांचे पैसे कशा प्रकारे हडप करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मग तो कोणीही असू दे, सर्वांवर कारवाई होईलच.

आर्थिक गुन्हे विभागाकडून तपास

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी मळकर्णे-सांगे येथील फार्म हाऊसवर पोलीस पाठवले असल्याचा दावा केला होता. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रीया जाणून घेतली असता, मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्याला याची कल्पना नाही आणि जर पोलिस फार्म हाऊसवर गेले असेल तर आर्थिक गुन्हे विभाग तपास करण्यासाठी गेले असावे.

‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील ‘मॅडम’चा शोध लावणारच

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसे दुप्पट करण्याचे प्रकरण जुलै 2023 मधील असून हे प्रकरण पुढे करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणावर पडदा पाडू पहात असेल तर ते आम्ही कदापी होऊ देणार नाही. कॅश फॉर जॉब प्रकरणातील त्या ‘मॅडम’चा आम्ही शोध लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल रविवारी दिला आहे. मडगाव रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सुमारे दीड वर्षापूर्वी घडलेल्या आर्थिक घोटाळ्यावर भाष्य केले आहे. यावर आमदार विजय सरदेसाई यांनी आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलेय की, मुख्यमंत्री या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित व्यक्तीला लंडनमधून आणणार असल्याचे सांगतात हे ऐकून आपल्याला चांगले वाटले. मात्र, या प्रकरणासाठी आपण मुख्यमंत्र्यांना किमान 25 वेळा फोन केला, त्यांच्याशी संपर्क साधला. मुख्यमंत्र्यांचा ओएसडी तुषार वेर्णेकर यांना भेटलो आहे. तुषार वेर्णेकर यांनी या प्रकरणात आम्हाला थोडा आधार केला आहे. पण, हा आधार करताना, त्यांनी थोडी चूक केली. त्यांनी ‘रेड कॉर्नर नोटिस’ला अगोदर अर्ज केला. तो ‘ब्ल्यू कॉर्नर’ला नोटीसला करायला पाहिजे होता. ही चूक झाल्यामुळेच गोवा पोलिस याप्रकरणी विशेष तपास करू शकले नाहीत. परंतु, मुंबई पोलिसांनी या प्रकरणी पाऊल मारले व संशयिताने जे पैसे गुंतविले होते, ते वसूल केले. मात्र, हे गोवा पोलिसांना शक्य झाले नव्हते.

आता मुख्यमंत्री जागे झाले आहे व चौकशी करतात, आपण, या चौकशीचे स्वागत करतो. केवळ चौकशी करतो म्हणून चालणार नाही. तर सखोल चौकशी करून लंडनमध्ये पळून गेलेल्या संशयिताला ताब्यात घ्या, अशी मागणी विजय सरदेसाई यांनी केली आहे. या प्रकरणात आपल्या मित्रांना गुंतवून आपली बदनामी करू पहात आहे. यावरून मुख्यमंत्री कॅश फॉर जॉब प्रकरणात विषयांतर करतात. मात्र, आज कॅश फॉर जॉब हाच विषय गोव्यात महत्वाचा आहे. त्यात विषयांतर करण्याचा प्रयत्न करू नका तसेच आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका. आर्थिक घोटाळ्यातील पैशांची वसूली झालेली आहे व वसूल करण्यासाठी काहीच बाकी राहिलेले नाही. तसे पत्र न्यायालयातून मिळालेले आहे. हे सर्व होईपर्यंत मुख्यमंत्री काय करीत होते, असा सवाल विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे. कॅश फॉर जॉब प्रकरणात आता चेंडू मुख्यमंत्र्यावर आला आहे, या प्रकरणात ‘मॅडम’चा शोध घेण्यासाठी गोव्यातील जनता उत्सूक आहे. तेव्हा, आर्थिक घोटाळ्याच्या गोष्टी सांगण्यासाठी, लोकांना वेडे करण्यासाठी आले आहात काय ? गोव्यातील जनता मूर्ख नाही, असे विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article