Sangli Miraj Dangal I मिरज दंगलप्रकरणी 150 जणांवर गुन्हा
मिरज दंगलप्रकरणी १५० जणांवर गुन्हा; मुख्य आरोपीसह २२ अटकेत
मिरज : अपशब्द एका समाजाबद्दल वापरल्याच्या कारणातून दंगलसदृश परिस्थिती निर्माण होऊन जमावाने धुडगुस घातल्याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे १५० हुल्लडबाजांची ओळख पटविली आहे. यातील ३५ जणांची नावे निष्पन्न झाली असून मुख्य संशयितासह २२ जणांना ताब्यात घेतले.
शहरात कायदा सुव्यवस्था नियंत्रणात असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महत्त्वाच्या चौकांमध्ये दंगल नियंत्रण पथकासह पोलीस बंदोबस्त तैनात आहे. याप्रकरणी एकावर तर बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी १५० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
बुधवारी दिवसभर संशयीतांची धरपकड सुरू होती. कोल्हापूर परिक्षेत्राचे प्रभारी महानिरीक्षक आणि पुणे विभागीय सीआयडीचे महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनी दंगलग्रस्त भागात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
शहरातील शास्त्री चौक येथे एका तरुणाने मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरल्याच्या कारणातून मंगळवारी रात्री दोन गटात तुफान राडा झाला. जमावाने एकाचे घर, मेडिकल दुकान फोडले. वाहनांची तोडफोड केली. आरोपीला अटक करुन जमावाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यावर जमावाने धडक दिली.
यावेळीही दगडफेक करण्यासह चौकातील डिजिटल फलक फाडले. जोरदार घोषणाबाजी करत पोलीस उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर जमावातील काही तरुण धावून जाताना दिसले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. रात्री दोन वाजेपर्यंत शहरात ठिकठिकाणी पेटोलिंग राबवित परिस्थिती नियंत्रणात आणली.
त्यानंतर सकाळी आमदार सुरेश खाडे, इद्रीस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांचे लोक्यतिनिधी, हिंदुत्ववादी संघटना, मुस्लिम संघटना आणि शांतता कमिटीच्या सदस्यांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. दंगेखोरांना पकडून कडक कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याच्या मुळाशी पोलीस पोहोचले. जातीय अपशब्द वापरल्याच्या कारणातून हा दंगा निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. संबंधित तरुणाला मंगळवारी रात्रीच ताब्यात घेतले. पोलिसांनी शास्त्री चौकापासून लक्ष्मी मार्केट, महाराणा प्रताप चौक आणि शहर पोलीस ठाण्यापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यातून जमावातील १५० हून अधिक हुल्लडबाजांची चेहरा ओळख करण्यात आली.
बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातील ३५ जणांची नावे निष्पन्न करून रात्रीपर्यंत २२ जणांना ताब्यात घेतले. सर्व संशयीतांना ताब्यात घेऊन कारवाई करणार असल्याचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. यासाठी वेगवेगळी पोलीस पथके पाचारण केली असून, नशेखोर, दंगेखोरांची रात्री उशिरापर्यंत धरपकड सुरूच होती.
शहरात सध्या कायदा सुव्यवस्था नियंत्रणात आहे. सर्व व्यवहार पूर्ववत सुरू आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. तसेच कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून प्रमुख चौकांसह संवेदनशील भागात दंगल नियंत्रण पथक व सुरक्षा बदलाचे पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.
वेगवेगळी पथके नियुक्त करून ठिकठिकाणी केल्या जाणाऱ्या जमावावरही कारवाई सुरू आहे. सोशल मीडियावरही पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. तेहाताळणाऱ्या व्यक्ती व समाज माध्यमांचे विविध ग्रुप यांची नावे संकलीत करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे.
दंगलग्रस्त भागात महानिरीक्षकांकडून पाहणी
दंगल परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरही अधिक्षकांसह सर्व अधिकारी मिरजेत दिवसभर ठाण दं मांडून होते. संचलनाद्वारे नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले. दुपारी कोल्हापूर परिक्षेत्राचे प्रभारी महानिरीक्षक आणि पुणे विभागीय सीआयडीचे महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांनीही शहरात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. शहर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसोबत सुमारे तासभर बैठक घेऊन तपास आणि कारवाईबाबत त्यांनी सुचना
केल्या. त्यानंतर चारचाकी वाहनातूच पोलिस वणे परिसर, लक्ष्मी मार्केट चौक, महाराणा प्रताप चौक, सराफ रोड, गणेश तलाव परिसर, महात्मा गांधी चौकी, छत्रपती शाहू महाराज चौक, स्टैंड चौक मार्गे दंगलग्रस्त असलेल्या शास्त्री चौकापर्यंत पाहणी केली. तेथे बंदोबस्तास असलेल्या कर्मचाऱ्यांना सुचना दिल्या.
दंगा नियंत्रणासाठी पोलिसांची शिकस्त
शास्त्री चौकात झालेल्या राड्यानंतर शेकडो तरुण जमाव करुन रॅली काढत मुख्य मार्केटकडे आले. सुरूवातीला काय झाले, हेच समजत नव्हते. घोषणाबाजी सुरू झाली, दुकाने बंद करायला लावली, वाहनांची तोडफोड आणि डिजीटल फलकांची फाडाफाड सुरू झाली.
यावेळी उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीला पकडून आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी जमावाकडून सुरु होती. उशिरापर्यंत दंगा शांत होत नव्हता. त्यामुळे अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्यासह दोन उपविभागीय अधिकारी, सात निरीक्षक, १६ सहायक उपनिरीक्षक, दोन दंगल नियंत्रण पथक, एक स्ट्रायकींग आणि चारशे अंमलदार असा बंदोबस्त नेमण्यात आला. त्यानंतर बळाचा वापर करुन जमावाला पांगवले.
जातीय सलोखा बिघडविणाऱ्यांची गय करणार नाही
शहरात जातीय सलोखा ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत. नशेखोर आणि दंगेखोर व्यक्तींमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला तर कोणाचीही गय केली जाणार नाही. पोलीस प्रशासन सक्षमपणे काम करत आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
सोशल मीडियावर अफवा पसरविल्यास कडक कारवाई केली जाईल. इथून पुढे पोलिसांच्या परवानगीशिवाय कोणासही डिजिटल फलक लावता येणार नाही. संघटीत गुन्हेगारी करणाऱ्यांना मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू आहे. राजकीय पक्षांसह धार्मिक व सामाजिक संघटनांच्या सदस्यांची बैठक घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शहरात कोणताही अनुचित घडत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. तातडीने कारवाई केली जाईल.
संदीप घुगे (पोलीस अधीक्षक, सांगली)