तातडीने 15 वन्यजीव डॉक्टरांची होणार नेमणूक
मुख्यमंत्र्यांकडून तत्वत: मंजुरी : वनमंत्री ईश्वर खंड्रे यांची माहिती
बेंगळूर : भुतरामहट्टीच्या राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील 31 काळविटांचा मृत्यू झाला असून राज्यात तज्ञ पशूवैद्यांची प्रकर्षाने कमतरता जाणवत आहे. राज्यातील प्राणीसंग्रहालये आणि हत्ती छावण्यांमध्ये वन्यजीव डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे स्वतंत्र केडर निर्माण करून 15 तज्ञ पशूवैद्यांची नेमणूक करण्यास मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मंजुरी दिली आहे. वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी मंगळवारी ही माहिती दिली. बेळगावमधील प्राणी संग्रहालयात काळविटांचा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त झाला आहे. त्यामुळे येथील इतर काळविटांवर बन्नेरघट्टा राष्ट्रीय वनोद्यानातील तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. स्थानिक पातळीवर तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने आता वन खात्याने ठोस पावले उचलली आहेत. तज्ञ पशुवैद्यांची नेमणूक करण्यासाठी तातडीने हालचाली सुरू असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले आहे.
भुतरामहट्टी येथील प्राणीसंग्रहालयात 31 काळविटांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री ईश्वर खंडे यांनी मंगळवरी राज्यातील सर्व 9 प्राणीसंग्रहालयांच्या प्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. वन्यजीव डॉक्टरांची नेमणूक होईपर्यंत सध्या कार्यरत असलेल्या पशुवैद्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. कित्तूर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयातील काळविटांचा मृत्यू हेमोरेजिक सेप्टिसेमिया या जीवाणू संसर्गामुळे झाला आहे, याची पुष्टी डॉक्टरांनी केली आहे. हा संसर्ग हवा, पाणी, आहार आणि प्राणी पालकांमार्फत फैलाव झाला आहे का, याचे अध्ययन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच इतर प्राण्यांमध्ये त्याची लागण होऊ नये याकरिता आवश्यक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
एसओपी तयार करण्याचे निर्देश
प्राणीसंग्रहालयातील वन्यजीवांचे व्यवस्थापन आणि संसर्ग झाल्यास कोणत्या पद्धतीने कार्यवाही करावी, कोणत्या खबरदारी घ्याव्यात आणि त्याचे सक्तीने पालन करावे, या संदर्भात प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) तयार करण्याचे निर्देश वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्यास ऑडिट
एखाद्या वेळेस प्राणीसंग्रहालयातील किंवा वनोद्यानातील कोणत्याही प्राण्यांचा मृत्यू झाल्यास विनाविलंब ऑडिट रिपोर्ट तयार करून सरकारला माहिती द्यावी. 31 काळविटांचा अनैसर्गिक मृत्यू ही धोक्याची घंटा आहे. उर्वरित 7 काळविटांनाही संसर्ग झाला असून त्यांच्यावर आवश्यक उपचार करावेत तसेच राज्यातील सर्व प्राणीसंग्रहालयांमध्ये खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश मंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिले. बन्नेरघट्टा वनोद्यानातून शेजारील राज्यात गव्याला भूल देण्याचे इंजेक्शन दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. यात अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निष्काळजीपणा झाल्याची तक्रार आहे. या संदर्भात तपास करून अहवाल सादर करण्याची सूचनाही ईश्वर खंड्रे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. बैठकीला प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे अध्यक्ष रंगास्वामी, मुख्य वन्यजीव परिपालक सी. सी. रै व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.