जमिनीखाली 15 मजली इमारत
स्विमिंगपूलपासून सुपरमार्केटपर्यंत सर्वकाही
ज्याप्रकारे विविध देश परस्परांना भिडत आहेत आणि आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर परस्परांच्या विरोधात करत आहेत ते पाहता प्रत्येकाला स्वत:ची सुरक्षा सुनिश्चित करण्याची गरज आहे. जुन्या काळात बॉम्बहल्ल्यांपासून वाचण्यासाठी बंकर तयार केले जात होते. सद्यकाळात अण्वस्त्रांच्या धोक्याची भीती असून त्यासाठी देखील बंकर्सची निर्मिती होत आहे. हा बंकर जमिनीखाली असून तो कुठल्याही स्फोटापासून वाचवू शकतो. अमेरिकेत अशाच एका बंकरची निर्मिती झाली आहे. हा बंकर कमी आणि पूर्णच्या पूर्ण इमारत असून ती देखील जमिनीखाली निर्माण करण्यात आली आहे. या विशाल बंकरची निर्मिती अण्वस्त्र हल्ल्यांपासून वाचण्यासाठी करण्यात आली आहे. तर जगावर विनाशाची वेळ ओढवली तरीही या बंकरचा वापर केला जाऊ शकतो. हा बंकर अमेरिकेच्या कंसास येथे आहे. मैदानामध्ये तुम्हाला या बंकरमध्ये जाण्यासाठीचे एंट्री गेट दिसून येईल. या बंकरचे नाव सर्वाइवल कॉन्डो असून याच्या 8 टन स्टीलच्या दरवाजातून प्रवेश केल्यावर एक भूमिगत शहर दिसून येते.
जमिनीच्या 200 फूट खाली इमारत
याला इमारत म्हणा किंवा शहर याची निर्मिती 200 फूट जमिनीखाली करण्यात आली आहे. याची निर्मिती 15 मजल्यांमध्ये झाली आहे. यात दैनंदिन जीवनादरम्यान आवश्यक असणाऱ्या सर्व सुखसुविधा आहेत. यात एक सुपरमार्केट असून त्यात खाण्यापिण्याच्या गोष्टी सहजपणे मिळून जातात. इमारतीत स्विमिंग पूल देखील आहे. येथे जिम, पेट पार्क असून मेडिकल युनिटही तयार करण्यात आले आहे. याचबरोबर इमारतीत छोटेसे चित्रपटगृह, लायब्रेरीसारखी सुविधा देखील आहे. येथे राहण्यासाठी एक अपार्टमेंट 25 कोटी रुपयांचे आहे. यातील खोल्यांमध्ये जकूजी, मिनी बार यासारख्या सुविधा देखील मिळतात.